उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नितीशकुमार होणार?

हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आता एका वैचारिक वळणावर आलीय

Updated: Nov 17, 2019, 06:31 PM IST
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नितीशकुमार होणार?  title=

मुंबई : उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारधारेच्या पक्षांसोबत सत्तेत जाण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेची ही वाटचाल पाहता उद्धव ठाकरे हे नितीशकुमारांसारखं राजकारण करताना दिसतायत. आगामी काळात उद्धव ठाकरे आघाडीसोबत राहिले तर त्यांची प्रतिमा 'महाराष्ट्राचे नितीशकुमार' अशी होऊ शकते. शिवसेना म्हणजे ज्वलंत हिदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना... मराठी माणसाच्या मुद्यावर उभी राहिलेली शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर विस्तारत गेली. मुंबईतून राजकीय वाटचालीला सुरुवात केलेली शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली. पन्नास वर्षांच्या राजकीय वाटचालीत ३५ वर्षं शिवसेना भाजपसोबत युतीत राहिली. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली १९९५ साली राज्यात युतीची सत्ताही आली. केंद्रातल्या एनडीए सरकारमध्ये शिवसेनेला अनेक मंत्रिपदं मिळाली. शिवसेनेचा राजकीय प्रवास हा हिंदुत्वाच्या मार्गानंच झाला. जेव्हा भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाला तेव्हा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व शिवसेनेचा श्वास असल्याचं ठासून सांगितलं.

हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आता एका वैचारिक वळणावर आलीय. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत 'महाशिवआघाडी'चं सरकार राज्यात अस्तित्वात आल्यास शिवसेना त्यांच्या वैचारिक भूमिकेचं काय करणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. उद्धव ठाकरे आक्रमक हिंदुत्वाला मुरड घालून नितीशकुमारांच्या राजकारणाचा कित्ता गिरवतील का? अशी चर्चा सुरु झालीय.

नितीशकुमार यांचा जदयू जरी सेक्युलर असला तरी त्यांना भाजपशी युती करण्यात कधी वावडं वाटलं नाही. कधी काँग्रेसशी आघाडी करताना नितीशकुमारांना वैचारिक अडचण झाली नाही. उद्धव ठाकरेंनी येत्या काळात त्यांच्या भूमिकेत बदल केल्यास किंवा सौम्यपणा आणल्यास त्यांना काँग्रेससोबत जाण्यात अडचण राहणार नाही असं सांगण्यात येतंय. शरद पवारांनीही नेमका हाच मुद्दा मांडलाय.

राजकारणात टिकायचं तर राजकीय लवचिकता दाखवायला हवी हे उद्धव ठाकरेंना एव्हाना कळून चुकलंय. आक्रमक हिंदुत्वही नाही आणि मवाळपणाही नाही असा राजकारणाचा मध्यममार्ग स्वीकारल्यास शिवसेना भविष्यात कोणत्याही विचारधारेच्या पक्षासोबत सत्तेत राहू शकते. असं झाल्यास उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नितीशकुमार होतील यात कोणतंही दुमत नाही.