सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबईकरांना पडलेला प्रश्न... 

Updated: Dec 30, 2020, 02:08 PM IST
सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबाबत काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे title=

मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. त्यानंतर अनेक काळ कधीही न थांबणारी लोकल सेवा अनेक महिने बंद होती. त्यानंतर हळूहळू अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लोकल सेवा बंद केली गेली होती. पण धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे लोकलसेवा मर्यादित लोकांसाठी सुरु आहे. सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पण यावर अजून तरी ठोस उत्तर कोणाकडेच नाही.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, 'नव वर्षात रुग्ण संख्या किती वाढतेय त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबईतील लोकल सेवा सुरू करायच्या की नाही, शाळा, कॉलेज सुरू करायच्या की नाही हे सगळे निर्णय संख्येवर अवलंबून आहेत. यूकेतील नवीन स्ट्रेनवर आपण लक्ष ठेवून आहोत. याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतील.'

कोरोनाचा नवा व्हायरस ब्रिटनमध्ये आढळल्यानंतर संपूर्ण जगात चिंता वाढल्या आहेत. ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. पण त्याआधी भारतात आलेले काही प्रवाशी हे पॉझिटिव्ह आढळल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. महाराष्ट्रात नव्या कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

ब्रिटनमधून अनेक प्रवाशी राज्यात दाखल झाले आहेत. त्यापैकी काही जण हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पण त्यांना ब्रिटनमधील कोरोनाची लागण झाली आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही.