काँग्रेसमध्ये परतणार नाही, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार - राणे

आपण काँग्रेसमध्ये परतणार नसून आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे  नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. 

Updated: Jan 22, 2019, 11:32 PM IST
काँग्रेसमध्ये परतणार नाही, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार - राणे title=
संग्रहित छाया

मुंबई : आपण काँग्रेसमध्ये परतणार नसून आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. राणे काँग्रेसमध्ये पतरणार, अशी चर्चा मागील दोन दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याला पूर्णविराम देताना शिवसेना-भाजपाची युती झाली तर आपण या युतीमध्ये सहभागी होणार नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू असेही राणेंनी स्पष्ट केले आहे. 

मोदींची आता हवा राहिलेली नाही!

देशात २०१४ साली भाजपसाठी जे वातावरण होते ते वातावरण आता राहिले नाही. त्यावेळी मोदींची हवा होती. आता परिस्थिती बदलेली आहे. भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभेच्या जागा मिळतील आणि केंद्रात २००च्या जवळ त्याची संख्या असेल, असेही राणेंनी 'झी २४ तास'ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना युती झाली तर आपला मार्ग मोकळा आहे. मी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. महाराष्ट्रात माझे उमेदवार असतील. मात्र, उमेदवार कोण असतील हे सांगण्यास नकार दिला. दरम्यान, रत्नागिरी - सिंधुदुर्गमधून नीलेश राणेच असतील, असे स्पष्ट केले.

नीलेश राणे यांनी ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. मात्र यावर राणे यांनी भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, नीलेश हा आधी काहीही बोलला नाही. नीलेशच्या वडिलांना कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते आवडले नसेल, म्हणून तो बोलला असेल, असे राणे म्हणालेत.

' माझा स्वभाम मला फायदेशीर'

दरम्यान, शिवसेना सोडली, काँग्रेस सोडली, आता भाजपवर तुम्ही नाराज आहात, याला तुमचा स्वभाव कारणीभूत आहे का? यावर ते म्हणाले माझा स्वभाव आहे तसाच आहे. या स्वभावाचा मला फायदाच झाला आहे. त्यात बदल होणे शक्य नाही. अन्याय झाला तर पेटून उठणार, तशी बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे मी माझ्या स्वाभिमान दुखावून घेणार नाही. साहेबांना सांगूनच बाहेर पडलो. उद्धव ठाकरेंमुळे मी शिवसेना सोडली आहे. जिथे स्वाभिमानला जागा नाही, तिथे राहण्यात काय अर्थ, असे राणे म्हणालेत. तसेच राणेंची नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनामा समितीवर भाजपने नियुक्ती केली आहे. नाराज राणेंना खूश करण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची असल्याची चर्चा आहे. मी भाजपवर नाराज नाही. मी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे, असे मी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितले आहे. त्यांची कालच भेट घेतली आहे, असे राणे यांनी सांगितले.

त्यांची समजूत काढू - राणे

सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जवळच्या व्यक्तींनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. कुडाळ तालुक्यातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीमाना अस्त्र बाहेर काढले. विकास कुडाळकर, दादा साईल आणि दीपक नारकर यांनी राजीनामे दिले. याबाबत राणे यांनी असं काही होणार नाही. आपण त्यांची नाराजी दूर करु असे सांगत तेच पदाधिकारी असतील असे सूचीत केले आहे.