कलामांसाठी 'दीदी' फेसबूकवर...

Last Updated: Saturday, June 16, 2012 - 13:56

 www.24taas.com, कोलकता  

 

भारतीयांचं मत तेच माझं मत, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासाठी फेसबूकवर धाव घेतलीय. 'राष्ट्रपती कसा असावा, हे जाणणाऱ्या लोकांना मी हाक देतेय' असं म्हणत त्यांनी सरळसरळ भारतीयांनाच आवाहन केलंय.

 

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावावर अडून बसणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी डॉ. कलाम यांनीच राष्ट्रपती व्हावं ही लाखो भारतीयांची इच्छा असल्याचं म्हटलंय. 'माझा पक्ष एक छोटा पक्ष आहेच पण दुसऱ्यांप्रमाणे माझ्याकडे साधनंही नाहीत. विश्वास आणि खरेपणावर आम्ही आत्तापर्यंत चालत आलोय. पूर्ण जीवनभर मी माझ्या सिद्धांतावर कायम आहे. ज्या दिशेनं पाऊल टाकते त्यावर मी अटळ राहते', असं ममता दीदी फेसबूकवर म्हणतात. देशाचे राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम यांच्या नावाची सार्वजनिक मागणी केली जावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय. 'तुमचाही म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे. मी लोकांच्या इच्छेचा आदर करीन. डॉ. कलाम हे नेहमीच क्षुद्र राजनीतीपासून दूर राहिलेत. निष्पक्ष, अभ्यासू आणि नेहमीच खऱ्याचा आदर करणारा असा हा नेता आहे आणि अशाच नेता राष्ट्रपतीपदावर असावा अशी जनतेचीही इच्छा' असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

मुलायम सिंह यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांनी डॉ. कलाम यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं जावं, अशी मागणी केली होती. पण, काही वेळातच समाजवादी पार्टीनं आपण मुखर्जींना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे चिडलेल्या ममता बॅनर्जी यांनी आत्ता कुठे खेळ सुरू झालाय, असं म्हटलं होतं. याचवेळी आपण डॉ. कलाम यांच्या नावावर ठाम असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.

 

.

 

First Published: Saturday, June 16, 2012 - 13:56
comments powered by Disqus