कोकणचो... राजा कोण ?

राज्याचं सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे ते सिंधुदुर्गात. हाणामारी आणि राड्यानं संवेदनशील ठरलेल्या आणि उद्योगमंत्री नारायण राणेंच्या प्रतिष्ठेची ठरणाऱ्या तीन नगरपरिषदांची मतमोजणी आज होत असून तिथं एकवटलेले विरोधक राणेंवर मात करणार की राणे आपलं वर्चस्व राखणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Updated: Dec 12, 2011, 05:42 AM IST

झी २४ तास वेब टीम, सिंधुदुर्ग

 

राज्याचं सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे ते सिंधुदुर्गात. हाणामारी आणि राड्यानं संवेदनशील ठरलेल्या आणि उद्योगमंत्री नारायण राणेंच्या प्रतिष्ठेची ठरणाऱ्या तीन नगरपरिषदांची मतमोजणी आज होत असून तिथं एकवटलेले विरोधक राणेंवर मात करणार की राणे आपलं वर्चस्व राखणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. वेंगुर्लेत राड्यानं सुरु झालेली निवडणूक नंतर आरोप-प्रत्यारोपांनी गाजली.

 

काल दिवसभर शांततेत मतदान झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात मालवणात राडा झाला आणि परंपराही कायम राखली गेली. त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालात जनतेनं काय कौल दिला आणि या निकालानंतर सिंधुदुर्गात काय प्रतिक्रिया उमटेल याची उत्सुकता वाढली आहे. कोकणचा राजा कोण ? नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्यातल्या राजकीय संघर्षाचा निकाल आज नगर परिषद निवडणुकीत लागेल.

 

राणेंच्या बालेकिल्ल्यात चाल करून आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादीचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांना रत्नागिरी-चिपळूणात मात्र स्वकियांचंच आव्हान आहे. जाधवांच्या मुलानं बंडखोरी करत काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात वेगळी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं तिथं कौल कुणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.   या निमित्तानं भास्कर जाधव आणि नारायण राणें यांच्यात गेले काही महिने सुरु झालेल्या संघर्षाचा फैसलाही मतदान यंत्रातून होईल.