देवकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची धावाधाव सुरू झालीय. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात देवकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.

Updated: Aug 7, 2012, 03:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची धावाधाव सुरू आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात देवकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास देवकरांना दिलासा मिळालाय.

 

घरकूल घोटाळ्यातले आरोपी असलेल्या देवकरांना यापूर्वीही अटक झाल्यानंतर लगेचच जामीनही मंजूर झाला होता. मात्र, हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं त्यांचा जामीन काल रद्द केला. देवकरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जामीन मिळवून अटक टाळण्यासाठी त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली  होती. सुप्रीम कोर्टानं  पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश आजच्या सुनावणीत दिलेत. त्यामुळे देवकरांना तूर्तास तरी दिलासा मिळालाय.  पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

 

गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मंत्री वादात सापडले आहेत. देवकर घरकूल घोटाळ्यात गुरफटले गेलेत तर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावरही सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जंग जंग पछाडलंय. मात्र, या दोन्ही मंत्र्यांचीही राष्ट्रवादीकडून सातत्यानं पाठराखण होताना दिसतेय.

 

.