मराठा, विदर्भात वादळासह गारांचा पाऊस

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांसह संत्रा, गहू, चणा सारख्या पिकांना मोठा फटका बसला बसलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2014, 11:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांसह संत्रा, गहू, चणा सारख्या पिकांना मोठा फटका बसला बसलाय.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज वादळी वा-यांसह पाऊस झाला. या पावसामुळे शहर भागात जनजीवन विस्कळीत झालं. मात्र पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, विजयनगर, सावळज या भागात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तर कोल्हापुरात अवकाळी पावसामुळे अनेक भागातली ऊस तोडणी थांबवावी लागली.
औरंगाबाद, बीडसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये काल ऐन मार्चमध्ये गारांसह तुफान पाऊस झालाय. लिंब, बोराएवढ्या या गारा होत्या... पण मार्चमधल्या या प्रचंड पावसामुळे गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय.
नागपूरसह विदर्भात आलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एकट्या नागपूर जिल्ह्यात वादळी वा-यासह गारपीट झाल्याने संत्रा, गहू, चणा सारख्या पिकांना मोठा फटका बसला असून एकूण १ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रार्थमिक सर्वेक्षणात ही बाब उघड झाली असून अंतिम सर्वेक्षणात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तसेच वादळी वा-यामुळे ग्रामीण भागातील घरांची पडझड झाली असून जनावरे पण जखमी झाली आहेत. या संबंधीचा अहवाल सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे गारपीट आणि वादळ आणखी काही दिवस येण्याची शक्यता आहे.
सोलापुरातल्या सांगोला तालुक्याला गारपिटीनं चांगलंच झोडपून काढलंय. घेरडी गावात गारपीट आणि वादळाचा तडाखा बसून लहान मुलीसह एका वृद्धाचा मृत्यू झालाय. तसंच ४० मेंढ्या आणि दोन गायींचाही मृत्यू झालाय. अवकाळी पावसामुळे डाळिंबाच्या बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
राज्यात अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतक-यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अशा शेतक-यांना शासनाकडून मदत म्हणून नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. आगामी ८ दिवसात आकडेवारी गोळा करून चांगली मदत करण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे असं विखे पाटील यांनी सांगितलंय. ही नैसर्गीक आपत्ती आहे त्यामुळे ती जाहीर करताना आचारसंहीतेचा प्रश्न येतच नाही असं ते म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.