बाळासाहेबांना भेटण्यासाठी सर्व क्षेत्रांतील दिग्गज `मातोश्री`वर

आज सकाळपासूनच ‘मातोश्री’वर अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींचा बाळासाहेबांच्या भेटीसाठी ओघ सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे देखील बाळासाहेबांना भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी रवाना झाले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 15, 2012, 12:33 PM IST

आज सकाळपासूनच ‘मातोश्री’वर अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींचा बाळासाहेबांच्या भेटीसाठी ओघ सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे देखील बाळासाहेबांना भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला पोहोचले आहेत.
सकाळी नाना पाटेकर मातोश्रीवर दाखल झाले. बाळासाहेब ठाकरेंशी जे ऋणानुबंध असणाऱ्या नाना पाटेकरने सकाळी बाळासाहेबांची भेट घेतली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांना बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना म्हणाले, की बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक असली, तरी काल रात्रीपेक्षा चांगली आहे. तसंच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बाळासाहेबांची प्रकृती आता स्थिर असल्याचं स्पष्ट केलं.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे, तसंच शिवसेनेचे सदा सरवणकर बाळासाहेबांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. याशिवाय अभिनेते विनय आपटे आणि दिग्दर्शक मधुर भंडारकरही बाळासाहेबांच्या भेटीसाठी आले. ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव आणि त्यांचे पुत्र अजिंक्य देवही बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी आले. याशिवाय उद्योगपती राहुल बजाजदेखील मातोश्रीवर पोहोचले.
काल संध्याकाळपासून बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी पसरल्यावर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली. तसंच यामुळे मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली. रात्री 8 च्या सुमारास शिवसेना नेते मनोहर जोशी तसंच शिवसेनेचे अन्य काही नेते मातोश्रीवर दाखल झाले. त्यानंतर साडेआठच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही मातोश्रीवर पोहचले. त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृती विचारपूस केली. त्याचवेळी बाळासाहेबांची प्रकृती नाजूक असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
9 वाजल्यापासून शिवसैनिक मातोश्री जमा होऊ लागले. ही बातमी जसजशी पसरत गेली, तसतशी मातोश्रीवरची शिवसैनिकांची गर्दी वाढत गेली. रात्री साडेअकरापर्यंत हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जमा झाले. त्याच वेळी अनेक ज्येष्ठ शिवसेना नेते तसंच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासारखे बाळासाहेबांचे निकटवर्ती मातोश्रीवर आले.
शिवसैनिकांची गर्दी वाढत गेल्यामुळे मातोश्रीचं कलानगरच्या बाजुचं फाटक बंद करण्यात आलं. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभे केले. कलानगरकडे येणारा मुख्य रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. रात्री साडेबाराच्या आसपास शिवसैनिकांची गर्दी वांद्रात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत पोहोचली होती. परिणामी महामार्गावरची वाहतुकही ठप्प झाली.
वाढत्या गर्दीमुळे परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. हा संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्वरित ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी काढले. बाहेर जमलेले शिवसैनिक शिवसेनाप्रमुख झिंदाबादच्या घोषणा देत होते. रात्री १ च्या सुमारास राज ठाकरे शिवसैनिकांशी बोलण्याकरिता मातोश्रीच्या गेटवर आले. मात्र काही आवाहन न करताच ते परत गेले.
दरम्यानच्या काळात रामदास कदम, लिलाधर डाके, सुर्यकांत महाडीक, एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते तसंच छगन भुजबळ, रामदास आठवले, संजय दत्त, मान्यता दत्त, बप्पी लहरी मातोश्रीवर आले. रात्री 2 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मातोश्रीच्या गेटवर आले आणि बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं. `आपल्या आशिर्वादानं बाळासाहेब बरे होतील. आम्ही आशा अजून सोडलेली नाही,` असं उद्धव म्हणाले.