'ऐतिहासिक' टी-२० वर्ल्डकप : भारतानं पाकिस्तानचा उडवला धुव्वा!

भारतात पहिल्यांदाच अंधांचा ट्वेन्टी २० वर्ल्डकप बंगळुरूमध्ये पार पडला. या वर्ल्डकपच्या अंतीम सामन्यात भारतानं पाकिस्तानला २० रन्सनं पछाडलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 13, 2012, 04:56 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
भारतात पहिल्यांदाच अंधांचा ट्वेन्टी २० वर्ल्डकप बंगळुरूमध्ये पार पडला. या वर्ल्डकपच्या अंतीम सामन्यात भारतानं पाकिस्तानला २० रन्सनं पछाडलंय. त्यामुळे पहिल्या-वहिल्या 'अंध टी-२० वर्ल्डकप'वर भारतानं आपल्या नावाचा ठसा उमटवलाय.
एक डिसेंबरपासून सुरू झालेला या वर्ल्डकपमधला अंतीम सामना गुरुवारी १३ डिसेंबर रोजी बंगळुरूमध्ये झाला. या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, वेस्टइंडीज, श्रीलंका, नेपाळ व यजमान भारतानं सहभाग घेतला होता. या स्पर्धेचं आयोजन गैरसरकारी संघटना समर्थन ट्रस्ट व भारतीय अपंग व अंध क्रिकेट संघाद्वारे करण्यात आलं होतं.
‘विश्व दृष्टिहिन क्रिकेट परिषदे’कडून मे २०११ मध्ये भारताकडे या स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या वर्ल्डकपचे सामने ‘लीग कम नॉकआऊट’ आधारावर खेळले गेले. आवाज करणाऱ्या बॉलच्या साहाय्याने हे ३९ सामने पार पाडले. या स्पर्धेचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड करण्यात आली होती.
टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडिया इंग्लंडकडून पराभवाचे धक्के पचवत असताना भारतीय अंध क्रिकेट संघाची या कामगिरीनं तमाम भारतीयांना खूश केलंय.