आणि बिबट्या बोलू लागला...

धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. म्हणता म्हणता आपल्या त्या खास शेजाऱ्यांनी ३५ चा आकडा गाठलाय. पाहूयात आपल्या शेजारच्या राज्यातला एक खास रिपोर्ट...

Updated: Jul 1, 2015, 02:56 PM IST
आणि बिबट्या बोलू लागला... title=

मुंबई : धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. म्हणता म्हणता आपल्या त्या खास शेजाऱ्यांनी ३५ चा आकडा गाठलाय. पाहूयात आपल्या शेजारच्या राज्यातला एक खास रिपोर्ट...
 
भारताची लोकसंख्या किती, महाराष्ट्राची किती आणि मग मुंबईची किती. तुम्हाला तुमच्याच संख्या- आकडे यांच्यात लय इंट्रेस्ट. कारण तुमची गणितं, समीकरण, फायदे-तोटे  त्या संख्यांवरच आधारित असतात. मग आम्ही जगलो काय, की मेलो तुम्हाला त्याच्याशी काय देणंघेण. पण बाप्पा, अशीही काही लोकं आहेत ज्यांना आमच्या जगण्याची आणि वाढण्याची फिकिर असते.

नॅशनल पार्कमधली लोकं आहेत ती. आम्ही किती आहोत, काय करतो, कसं जगतो हे जाणण्यासाठी पूर्वी नुसताच पाहाणी ससर्व्हे व्हायचा. ना त्याला आगा, ना पिछा...त्या सर्व्हेच्या आधारे दोन वर्षांपूर्वी आम्ही ढोबळमानानं २१ होतो...पण यंदा मात्र शास्त्रोक्त पद्धतीनं आम्हाला शोधलं गेलंय...आणि आम्ही थोडे थोडके नाही, तर तब्बल ३५ असल्याचं समजलंय...एकदम झकासं वाटलं राव...

निकीत सुर्वे. वाईल्ड़ लाईफ इन्स्टिट्यूटच्या डेहरादून शाखेचा हा विद्यार्थी. आमच्या जगाविषयी त्याला कमालीचं आकर्षण. आमच्या जगातच करियर करण्याचा त्यानं निर्णय घेतलाय.म्हणूनच की काय नॅशनल पार्कवाल्यांनीही आमचं जग जाणून घेण्याची जबाबदारी अगदी विश्वासनं त्याच्यावर सोपवली.

पठ्ठ्यानंही ती चोख पार पाडली...त्यानं आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी जाणून घेतल्या...आम्ही डिस्टर्ब होणार नाही याचीही त्यानं काळजी घेत, शार्प कॅमेरात आम्हाला टिपलं...इतकंच काय आमच्या सोबतीनं जगणारी हरीणं, वाघेटी, रानमांजरं, रानडुक्करही त्याच्या कॅमेरानं टिपली...गेले सहा महिने तो आमच्यातला एक होऊन नॅशनल पार्कात राहिला...

मध्य़ंतरी तुमचं नी आमचं जरा बिनसलंच होतं म्हणा...तुमच्या वस्त्यांवर चाल केल्याच्या आरोप आमच्यावर ठेवण्यात आला.. आमचं तर जगणंच मुश्कील होऊन बसलं होतं...चूक कोणाची होती या भूतकाळात आम्हाला डोकावायचं नाहीये, पण अलीकडे आम्हाला तुमचा शेजार आवडायला लागलाय, हळूहळू तुमच्या सोबतीनं आम्हीही जगायला शिकलोय राव...आता तयारी आणि साथ तुमच्याकडूनही हवीये...सध्या तरी बरं सुरु आहे, बघूया कसं जुळतंय आपलं यापुढे ते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.