राज-गडकरी स्वस्त व मस्त सौदा - शिवसेना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2014, 09:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय. गडकरी यांचे कसब असे की, त्यांनी ‘मनसे’प्रमुखांच्या हातावर दक्षिणा न ठेवता पाठिंबा मिळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे व कोणताही ‘टोल’ न देता न घेता ‘मनसे’प्रमुखांनी त्यास होकार दिल्याची बातमी फुटली आहे. जगाच्या राजकारणात इतका स्वस्त व मस्त सौदा आतापर्यंत झाला नसेल व त्याबद्दल गडकरी यांच्या व्यापारी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असा टोला सामनातून लगावण्यात आलाय.
काय म्हटले आहे सामनात
गडकरी हे एक पक्के व्यापारी गृहस्थ आहेत, याविषयी महाराष्ट्रीय जनतेच्या मनात तरी शंका राहिलेली नाही. सहकार, ऊर्जा, साखर, इथेनॉल, पाणी शुद्धीकरण अशा क्षेत्रांत तर गडकरी यांनी कर्तबगारीची ‘पूर्ती’ करून एक उत्तम व्यापारी म्हणून कीर्ती मिळवली आहेच, पण राजकारणातही कोणतेही भांडवल भरीस न घालता हवे ते मिळविण्याची कला त्यांनी प्राप्त करून घेतली आहे. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात गडकरी हे ‘मनसे’ पक्षाच्या प्रमुखांना भेटले व मोठीच खळबळ (?) उडवून दिली.
व्यापारी गडकरी यांनी असा प्रस्ताव ठेवला की, ‘‘महाशय, येत्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही अजिबात उमेदवार उभे करण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या उमेदवारांमुळे कॉंग्रेसविरोधी मतांचे विभाजन होईल व मोदी यांचे पंतप्रधान पद हुकेल. तेव्हा महाशय, विचार करा.’’ गडकरी यांनी हा बिनभांडवली प्रस्ताव महाशयांपुढे ठेवला व पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला असे म्हणतात. ‘टोल’चे आंदोलन फसले तसे राजकारण व भविष्यही फसले हे नक्की झाल्याने काय करावे व करू नये? टू बी ऑर नॉट टू बी असा ‘हॅम्लेट’ झाल्याने मित्रवर्य गडकरींनी ‘हॅम्लेट’ची सुटका केली.
गडकरी हे व्यक्तिगत नात्यांना जागले. कोणी कोणास जाग आणावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. ‘मनसे’ने महाराष्ट्रातील निवडणुका लढू नये, अशी विनंती करणे व त्यासाठी ‘मनसे’प्रमुखांना भेटणे हा त्यांचा वैयक्तिक मामला असू शकतो. स्वत: गडकरी हे नागपुरात लढत आहेत व त्यांच्या विरोधात ‘आप’च्या अंजली दमानिया उभ्या ठाकल्या आहेत. त्यात आणखी ‘मनसे’ उमेदवाराची भर नको असे गडकरींना वाटणे साहजिकच आहे. नागपुरातील लढत अटीतटीची आहे व शेवटपर्यंत ती तशीच राहणार. गडकरी यांच्यासारख्या तगड्या उमेदवारास ज्याअर्थी अघटित घडण्याची भीती वाटते त्यावरून मोदी यांच्या लाटेत पाणी किती व खळखळाट किती, असा प्रश्‍न सामान्यांना पडू शकतो व त्यास सर्वस्वी जबाबदार संभ्रम निर्माण करणारे नेते आहेत.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मोदी यांची हवा आहे. मोदी हे स्वयंप्रकाशी आहेत व त्यांनी स्वत:चे तुफान निर्माण केले आहे. महाराष्ट्रात तर शिवसेना-भाजपसह पाच पक्षांची महायुती मोदी यांना जास्तीत जास्त खासदार देण्याच्या निर्धारानेच रणात उतरली आहे. जागावाटपही सुरळीत पार पडले आहे. राजू शेट्टी, महादेव जानकर, रामदास आठवले यांच्या पक्षांनाही समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. शेवटी या वाटाघाटीच असतात व या वाटाघाटीत अनेकदा दम निघतो व घाम फुटतो. पण नितीन गडकरी यांचे कसब असे की, त्यांनी ‘मनसे’प्रमुखांच्या हातावर दक्षिणा न ठेवता पाठिंबा मिळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
मोदी या एकाच व्यक्तीभोवती देशाचे राजकारण आज फिरते आहे. मोदी हे महान असतील तर महाराष्ट्राचे लोक त्यांना
दणकून मतदान करतील. त्यामुळे मत विभागणीची चिंता कुणी करू नये. कारण शिवसेना त्यांच्या पाठीशी मजबुतीने उभी आहे. टोलच्या झोल आंदोलनात या मतविभागणीचा व स्वबळाचा फुगा फुटलाच आहे. महाराष्ट्रात ‘स्वबळा’ची भाषा करणारे, स्वबळावर सत्ता आणू पाहणारे आता गडकरीकृपेने लढणार नाहीत. हा त्यांचा सुटकेचा मार्ग आहे.
गडकरींमुळे अडलेल्या बाळंतिणीची सुटका होणार असेल तर त्यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. राजकारणात कोणी कोणासाठी ‘समाजसेवा’ करीत नाही. लोण्याच्या गोळ्यावर सगळ्याच बोक्यांचे लक्ष असते. साधुसंतांचे राजकारण आधीही नव्हते व आजही नाही. त्यामुळे गडकरींनी सांगितले, ‘लढू नका’ व त्यानुसार एरवी लढण्याची भाषा करणारे ‘लढायला तयार नाहीत’ हा सौदा गमतीचा आहे.
बिहारात रामविलास पासवान आले. त्यांनाही ११ जागांची बिदागी द्यावी लागली. सत्यनारायणास बोलवायचे व हाती तीर्थप्रसाद द्यायचा नाही, हे सध्याच्या सत्तानारायणी पूजेत तरी शक्य नाही, पण गडकरींनी मनसेप्रमुखांना सत्यनारायणास बोलावले, पण ‘प्रसाद मिळणार नाही’ असे बजावले. प्रसाद वाटून झाला आहे. त्यामुळ