राजू श्रीवास्तवने समाजवादी पार्टीचे तिकिट केले परत

हास्य कलाकार राजू श्रीवास्तव याने लोकसभा निवडणुकीचे समाजवादी पार्टीनं दिलेलं तिकीट परत केलेय. कानपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राजू विरोधात असहकार पुकारल्याने तो नाराज होता. त्यामुळे हे तिकिट परत केल्याचे राजू यांनी स्पष्ट केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 11, 2014, 05:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कानपूर
हास्य कलाकार राजू श्रीवास्तव याने लोकसभा निवडणुकीचे समाजवादी पार्टीनं दिलेलं तिकीट परत केलेय. कानपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राजू विरोधात असहकार पुकारल्याने तो नाराज होता. त्यामुळे हे तिकिट परत केल्याचे राजू यांनी स्पष्ट केले आहे.
समाजवादी पार्टीमध्ये राजू श्रीवास्तवने वर्षभरापूर्वीच प्रवेश केला होता. त्याचवेळी त्याला कानपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी घोषित करण्यात आली होती. तेव्हापासूनच राजूने कानपुरात मुक्काम ठोकला होता. परंतु, स्थानिक कार्यकर्त्यांनी राजूला असहकार केला. पुढेही हा प्रकार सुरू राहिल्याने राजूने आपले तिकिट परत करण्याचा निर्णय घेतला.
कानपूरमध्ये समाजवादी पार्टीचा काहीच प्रभाव नाही. तरीही मी मतदारसंघासाठी वेळ देत होतो. पण पक्ष कार्यकर्त्यांकडून मला सहकार्य मिळालेच नाही. त्यामुळे मी विचार केला आणि विचारांती हे तिकिट परत केले आहे. त्यामुळे हा हास्यकलाकार आता समाजवादी पक्षातून बाहेर पडणार की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव 1993 पासून चित्रपट उद्योगात काम करत आहे. मात्र, छोट्या पडद्यावरील हास्य शोमुळे तो प्रसिद्धीला आला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.