मोदींच्या गुजरातमधलं 'धार्मिक मॉक ड्रील' वादात!

गुजरात पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नुकतंच एका मॉक ड्रीलचं आयोजन केलं होतं. पण, या मॉक ड्रीलवरून भलताच वाद उपस्थित झालाय. 

Updated: Jan 2, 2015, 04:24 PM IST
मोदींच्या गुजरातमधलं 'धार्मिक मॉक ड्रील' वादात! title=

अहमदाबाद : गुजरात पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नुकतंच एका मॉक ड्रीलचं आयोजन केलं होतं. पण, या मॉक ड्रीलवरून भलताच वाद उपस्थित झालाय. 

गुजरात पोलिसांनी केलेल्या 'मॉक ड्रील'चा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये, 'मॉक ड्रील' करताना खोटे दहशतवादी इस्लामच्या समर्थनात घोषणा देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया क्षेत्रातील नर्मदा बांध क्षेत्रात झालेल्या मॉक ड्रीलचा आहे. यामध्ये, पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडलंय... आणि यावेळी ते ओरडताना दिसत आहेत.... 'तुम्हाला हवंय तर आमचा जीव घ्या... इस्लाम जिंदाबाद'

तसंच, यापूर्वीही या सुरतमध्ये पार पडलेल्या एका मॉक ड्रील करताना पोलिसांनी दहशतवाद्यांची भूमिका निभावणाऱ्या खोट्या दहशतवाद्यांना एका विशिष्ट धर्माची टोपी घातली होती... यामुळेच, मोठा वाद उत्पन्न झालाय. सूरतच्या या घटनेनंतर मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी ही चूक मान्य केलीय. मॉक ड्रील करताना पोलिसांनी एका खास धर्माच्या अनुयायांच्या टोप्या दहशतवादी दाखवण्यासाठी घालणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

राज्यात होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस ( ७ ते ९ जानेवारी) तसंच वायब्रंट गुजरात गुंतवणूक संमेलन (११ ते १३ जानेवारी) पूर्वी दहशतवादविरोधी अभ्यासासाठी हे मॉक ड्रील घेतले गेले होते.

आम्हालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची माहिती मिळाली, असं नर्मदाचे पोलीस अधिक्षक जयपाल सिंह राठोड यांनी म्हटलंय. अशी घटना प्रत्यक्षात घडली असेल तर त्याची चौकशी होईल आणि याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईल, असं राठोड यांनी म्हटलंय. 

 या घटना समोर आल्यानंतर गुजरात भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रमुखांसहीत अनेकांनी याचा निषेध केलाय. दहशतवादाला एखाद्या धर्माशी जोडणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.