मतदार जिथे `सिंग`, तिथे हवा `भांगडा किंग`!

काँग्रेसने पंजाबी लोक मोठ्य़ा प्रमाणावर असणाऱ्या मतदारसंघात लोकांना आकर्षित करण्यासाठी पंजाबी पॉपस्टार दलेर मेहंदीला निवडणुकीतच उभं करण्याचं ठरवलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 27, 2013, 04:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षांनी निवडून येण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकप्रिय नेत्यांपेक्षा लोकप्रिय सेलिब्रिटींना तिकिट देऊन मतं मिळवण्याचा ‘फंडा’ सर्वच पक्ष वापरू लागले आहेत. काँग्रेसने पंजाबी लोक मोठ्य़ा प्रमाणावर असणाऱ्या मतदारसंघात लोकांना आकर्षित करण्यासाठी पंजाबी पॉपस्टार `भांगडा किंग` दलेर मेहंदीला निवडणुकीतच उभं करण्याचं ठरवलं आहे.
दिल्लीमधल्या पंजाबी बहुल भागामध्ये `भांगडा किंग` दलेर मेहंदीच्या लोकप्रियतेचा वापर करून घेण्याचा काँग्रेसचा मानस आहे. ९० च्या दशकात दलेर मेहंदी या पंजाबी गायकाने धमाल उडवून दिली होती. देशा विदेशात दलेर मेहंदीच्या पंजाबी गाण्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. भांगडा हा पंजाबी प्रकार दलेर मेहंदीने लोकप्रिय केला. त्यानंतर त्याने अनेक सिनेमांमध्येहगी गाणी गायली, तसंच परदेशात मोठ्या प्रमाणावर त्याने म्युझिकचे कार्यक्रम केले. दिल्लीचा रहिवासी असणाऱ्या दलेरला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीमधील हिरवळ वाढवण्यासाठी दलेर मेहंदीने केलेल्या प्रयत्नांसाठी त्याला पुरस्कारही मिळाला आहे.
दलेर मेहंदीच्या लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. लुधियानामध्ये शिरोमणी अकाल तख्त पंजाबी मतगदारांना आकर्षित करण्यासाठी सनी देओलला उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या बेतात आहे. त्याला मतं मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचं स्थान बळकट आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी दलेर मेहंदीचा भांगडा किती उपयोगी पडेल, ते निवडणुकीत दिसून येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.