औषधविक्रेतांचा देशभरात संप; सामान्यांचे हाल

व्यापारी आणि प्राध्यापकांनी संप करून जनतेला वेठील धरलं असताना आज औषध विक्रेत्यांनीही एक दिवसांचा लाक्षणिक संप पुकारलाय.

Updated: May 10, 2013, 08:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
व्यापारी आणि प्राध्यापकांनी संप करून जनतेला वेठील धरलं असताना आज औषध विक्रेत्यांनीही एक दिवसांचा लाक्षणिक संप पुकारलाय.. प्रलंबित मागण्यांसाठी औषध विक्रेते काल मध्यरात्रीपासून संपावर गेलेत. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली जाईल असं संघटनेनं अन्न-औषध प्रशासन आणि पोलिसांना कळवलं आहे.

सरकारने यावर्षी आणलेल्या औषध धोरणात किरकोळ औषधविक्रेत्यांचे नफ्याचे मार्जिन कमी करून १२ टक्क्यांवर आणलंय. त्यातच मेडिकलचा दर्जा सुधारावा, फार्मसीस्ट नेमावा असे निर्बंध घातल्याने खर्चात वाढ आणि नफा कमी होणार आहे. त्यामुळे केंद्रसरकारने मार्जिन कमी करू नये अशी औषधविक्रेत्यांची मागणी आहे. निवेदनं देऊनही कोणतीही पावले उचलली नसल्यानं अखेर औषधविक्रेत्यांनी संपाचा पवित्रा घेतलाय.

या संपात देशभरातील साडेसात लाख औषधविक्रेते सहभागी होतील असा विश्वास औषध विक्रेता संघटनेनं व्यक्त केलाय. औषध विक्रेत्यांच्या संघटनेने गेल्या महिन्यात पंतप्रधान, केंद्रीय औषध मंत्रायल, सर्व राज्याचे मुख्यमंत्री यांना मागण्यांची निवेदने दिली होती. औषधविक्रेत्यांच्या या एकदीवसीय संपाचा फटका सर्वसामान्यांना नक्कीच बसणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.