रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.

Updated: May 5, 2016, 05:18 PM IST
रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला title=

बुंदेलखंड: बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे. बुंदेलखंडमध्ये लातूरसारखी पाण्याची समस्या नसल्यामुळे आम्हाला या पाण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया अखिलेश यादव सरकारनं दिली आहे. तसंच आम्हाला पाण्याची गरज भासली तर त्याची मागणी करु असं पत्रही उत्तर प्रदेश सरकारनं लिहीलं आहे. 

बुंदेलखंडच्या महोबा भागामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागातल्या 40 गावांना याचा फटका बसला आहे. दुष्काळामुळे गावातले अर्ध्यापेक्षा अधिक बोअरवेल सुकुन गेल्या आहेत. त्यामुळे टँकरनं या गावांना पाणीपुरवठा होत आहे. 

ट्रेननं पाणी आलं तरी याच टँकरनं पाणीपुरवठा करावा लागेल, असं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे. तसंच पाण्याची गरज आहे का नाही हे न विचारता रेल्वेनं आम्हाला पाणी पाठवत असल्याचं थेट सांगितलं अशी प्रतिक्रिया प्रशासनानं दिली आहे. 

या मुद्द्यावरून आता राजकारणही सुरु झालं आहे. श्रेय घेण्यासाठी भाजप नेत्यांनी केंद्राकडे पाण्याची मागणी केल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी केला आहे.