फिल्म रिव्ह्यू : परफेक्शनिस्ट आमिरचा परफेक्ट 'पीके'!

पीके

Updated: Dec 19, 2014, 04:13 PM IST
फिल्म रिव्ह्यू : परफेक्शनिस्ट आमिरचा परफेक्ट 'पीके'! title=

सिनेमा : पीके
दिग्दर्शन : राजकुमार हिरानी
कलाकार : आमिर खान, अनुष्का शर्मा, सौरभ शुक्ला और बमन ईरानी

मुंबई : राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'पीके' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आलाय. देवाच्या नावावर बिझनेस सुरु करणाऱ्यांवर हा सिनेमा भाष्य करताना दिसतोय. हा सिनेमा सध्या सुरु असलेल्या धर्माच्या ठेकेदारांना फैलावर घेतो... ही केवळ लोकांच्या मनातील भीती आहे ज्यामुळे, देवाच्या नावावर गोरखधंदा सुरु आहे आणि याचा पैसे कमावण्यासाठी पुरेपूर वापर होतोय. आज समाजात दोन देव आहेत... एक तर तो जो मानव बनवतो आणि दुसरा तो जो मानवाला बनवतो. मनोरंजनासोबत एक संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी राजकुमार हिराणी यांनी या माध्यमाचा पुरेपूर वापर केल्याचं सिनेमा पाहिल्यानंतर जाणवतं. 

काय आहे सिनेमाचं कथानक
पीके (आमिर खान) एक या एलियनला पृथ्वीवर आपल्यासारख्या व्यक्तींबद्दल माहिती करून घेण्यासाठी धाडलं जातं. पण, पृथ्वीवर पाऊल ठेवताच पीकेचं लॉकेट ज्याला तो 'रिमोट' म्हणतोय ते हरवतं... त्यानंतर त्याला आपलं रिमोट शोधायचंय. 

दुसरीकडे, दिल्लीत राहणाऱ्या जगत जननी उर्फ जग्गू (अनुष्का शर्मा) ही परदेशात शिकणारी मुलगी सरफराजच्या (सुशांत सिंह राजपूत) प्रेमात पडते. परंतु, तिचे कुटुंबीय मात्र या लग्नाला नकार देतात. एका तपस्वी महाराज (सौरभ शुक्ला) याच्या म्हणण्यानुसार, सरफराज जग्गूला फसवणार आहे... आणि त्यामुळेच जग्गूचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात आहेत.... आणि होतंही असंच... मग, काय जग्गू दिल्लीला परत माघारी येते. 

दिल्लीला आल्यानंतर जग्गू एका न्यूज चॅनलला जॉइन करते... आणि इकडे पीकेही आपल्या रिमोटच्या शोधात दिल्लीत दाखल होतो. जग्गूची पीकेशी पहिली भेट होते तेव्हा तिला त्याच्यामध्ये एक 'स्टोरी' दिसते... ती त्याच्या पाठलाग करते आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याची भेट घेते. 

पीके तिला आपण दुसऱ्या ग्रहावरून आल्याचं सांगतो तेव्हा तिला ते खोटं वाटतं... पण, पीके मात्र तिला ही गोष्ट पटवून देण्यात यशस्वी होतो... मग, अनुष्काही पीकेला रिमोट शोधण्यात मदत करते. 

यानंतर कहानी में आता हैं एक ट्विस्ट... आणि मग प्रेक्षक हसून हसून बेजार होतात.... पण, मग ही कथा पुढे कशी सरकते... हे तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच पाहायला हवं... 

सिनेमातील संवाद
या सिनेमातील संवाद जेवढे तुम्हाला हसवतील तेवढेच ते तुम्हाला विचार करायलाही भाग पाडतात. 'धरती पर बडा कन्फ्युजन है भाई' म्हणणारा पीके तुमच्यासमोर तेच प्रश्न मांडतो ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत तर आहेत का ते माहीत नाहीत... 

दुसऱ्या ग्रहावरून आलेला पीके भोजपुरी बोलणं शिकतो... मग तो 'प्लीज'ला पलीज, ग्रहाला गोला, 'मतलब'च्या ऐवजी मतबल असे अनेक शब्द आपल्या ढंगात बोलतो. आमिरच्या तोंडून हे डॉयलॉगही मजेशीर वाटतात. 

दिग्दर्शन 
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. एका दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या पण लोकांना खूप काही शिकवून जाणाऱ्या एका पात्रावर त्यांची ही कथा बेतलेली आहे. '३ इडियट्स' आणि 'मुन्ना भाई' सीरीज आपापल्या पद्धतीनं लोकांपर्यंत एक संदेश पोहचवण्यात यशस्वी ठरले होते. त्याचपद्धतीनं 'पीके'ही आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरलाय. 

अभिनय
परफेक्शनिस्ट आमिर आणि अनुष्का या कथेचे केंद्रबिंदू आहेत... अशावेळी दोघांच्याही अभिनयाला पैंकीच्या पैकी मार्क दिले जायला हवेत. आमिर खानचा हा रोल त्याच्या इतर भूमिकांपेक्षा हटकेच ठरलाय. तिथं अनुष्कानंही आपल्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिलाय. 

संजय दत्त आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी दर्शकांचं मन जिंकण्यासाठी त्या पुरेशा ठरतात. 

सिनेमाचं संगीत
सिनेमातील गाणीही उत्तम जमून आली आहेत. 'चार कदम' आणि 'टिंगा-टिंगा नंगा पुंगा' ही गाणी नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात... या सिनेमातलं सर्वात श्रवणीय गाणं आहे 'चार कदम... बस चार कदम'... हे गाणं बेल्जियमच्या ब्रूज्समध्ये चित्रीत करण्यात आलंय. आत्तापर्यंत कोणत्याही सिनेमामध्ये हे लोकेशन वापरण्यात आलं नव्हतं. हे गाणं म्हणजे स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली एक कविता आहे... हीच कविता त्यांनी सोशल वेबसाईट फेसबुकवरही शेअर केली होती. राजकुमार हिरानी यांना ही कविता भावली... आवश्यकतेनुसार थोडे फार बदल करून हीच कविता या सिनेमात गाणं म्हणून वापरण्यात आलीय. हे गाणं अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यावर चित्रीत करण्यात आलंय. तर हे गाणं गायलंय शान आणि श्रेया घोषाल यांनी...

शेवटी काय तर... 
नाताळांच्या सुट्टीच्या अगोदर प्रदर्शित झाला असला तरी हा सिनेमा तुमच्या विकेन्डसाठी निश्चितच चांगला ऑप्शन ठरू शकतो. सध्याच्या बॉलिवूड सिनेमांपेक्षा या सिनेमाचं कथानक नक्कीच तुम्हाला वेगळ असलेलं दिसेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.