फिल्म रिव्ह्यू : सुपरमॅन अर्जुन, बाहुबली मनोजचे 'तेवर'!

तेवर

Updated: Jan 9, 2015, 03:51 PM IST
फिल्म रिव्ह्यू : सुपरमॅन अर्जुन, बाहुबली मनोजचे 'तेवर'! title=

सिनेमा : तेवर
दिग्दर्शक : अमित शर्मा
डायलॉग : शंतनू श्रीवास्तव
संगीत : साजिद-वाजिद, इमरान खान
कलाकार : अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, मनोज वाजपेयी

नव्या वर्षात प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा म्हणून 'तेवर'कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा स्वाभाविक आहेत. 'तेवर' हा एका दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक असला तरी त्याच्या तगड्या आणि यंग स्टारकास्टमुळेही तो खूप चर्चिला गेला. या सिनेमाच्या निमित्तानं सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसतेय.

पण, हा सिनेमा प्रेक्षकांचा थोडा भ्रमनिरास करतो. 'नव्या बाटलीत जुनी दारू' भरून हा सिनेमा प्रेक्षकांसमोर वाढण्यात आलाय. दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तमिळ सिनेमा 'ओक्कडू' हा हिंदी रिमेक आहे... यामध्ये, दिग्दर्शकानं काही प्रयोग करून पाहण्याची कोणतीही तसदी घेतलेली नाही. जवळपास अडीच तासांपेक्षा जास्त वेळ सुरू असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना बोअर करण्यात यशस्वी ठरतो.

कथा
ही कहाणी आहे एका पोलीस अधिकाऱ्याचा (राज बब्बर) मुलगा पिंटूची(अर्जुन कपूर) ... पिंटूला नको त्या भानगडीत पडण्याची भारी सवय... आणि यामुळेच त्याची ओळख राधिकाशी (सोनाक्षी सिन्हा) होते.... एक दबंग नेता गजेंद्र (मनोज वाजपेयी) राधिकावर एकतर्फी प्रेम करतोय... राधिकाची ओळख पिंटूशी होते आणि 'सलमानचा फॅन' असलेला पिंटू गजेंद्रशी दोन हात करण्यासाठी तयार होतो... आणि मग अनेकदा दिसून येत असलेला बॉलिवूडमधला मसाला कथेत आपसूकच टाकला जातो. 

कलाकार
कथेत दम नसला तरी अर्जुन कपूरचं २०१४ हे वर्ष चांगलं जाणार असंच दिसतंय... त्याचे गुंडे, टू स्टेटस आणि फाईंडिंग फॅनी प्रेक्षकांनी उचलून धरले होते... बॉक्स ऑफिसवरही हे सिनेमे यशस्वी ठरले होते... कथा कंटाळवाणी वाटली तरी अर्जुन कपूरच्या फॅन्सना मात्र त्याचा हा रावडी अवतार पाहायला नक्कीच आवडेल...

सोनाक्षीच्या बाबतीत म्हणायचं तर सोनाक्षीला आपण यापूर्वी अशा भूमिकांमध्ये पाहिल्याचं आपल्याला जाणवत राहतं... सोनाक्षीला आपल्या भूमिकांमध्ये चोखंदळपणा आणण्याची गरज आहे. एकाच पद्धतीची अॅक्टींग आणि अॅटीट्यूड दिसून येतोय. 

राहिली गोष्ट मनोज वाजपेयीची... तर मनोजनं या सिनेमात कमाल केलीय... एका दबंग राजकारण्याच्या भूमिकेत आपण त्याला यापूर्वीही पाहिलं असेल तरी त्याची ही भूमिकाही वेगळी वाटते. त्याची डायलॉग्ज सादर करण्याची पद्धतही कमालीची आहे. त्याची भूमिका अनेकांच्या लक्षात राहण्यासारखी आहे. 

एकूणच काय तर...
दाक्षिणात्य मारझोडीचे सिनेमा आवडणाऱ्या प्रेक्षकांना हा सिनेमा आवडू शकतो... हा सिनेमा सिंगल थिएटर्सना टार्गेट करून बनवण्यात आल्याचं जाणवतं... अर्जुन कपूर आणि मनोज वाजपेयीचे फॅन्स नक्कीच त्यांच्या भूमिका पाहण्यासाठी हा सिनेमा पाहू शकतात... पण, फार अपेक्षा या सिनेमाकडून न ठेवलेल्याच बऱ्या...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.