आदिवासींची खिल्ली उडवली भाजपच्या या मंत्र्यानी

अखेर या कडाक्याच्या थंडीतही आदिवासी मुलांना स्वेटर मिळणार नाहीत हे स्पष्ट झालंय. मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. स्वेटर वाटपाची प्रक्रिया थांबवण्याची घोषणा करताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी थंडी कुठे आहे असा अजब प्रश्नच पत्रकारांना विचारला.

Updated: Jan 22, 2016, 11:26 PM IST
आदिवासींची खिल्ली उडवली भाजपच्या या मंत्र्यानी title=

योगेश खरे, नाशिक : अखेर या कडाक्याच्या थंडीतही आदिवासी मुलांना स्वेटर मिळणार नाहीत हे स्पष्ट झालंय. मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. स्वेटर वाटपाची प्रक्रिया थांबवण्याची घोषणा करताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी थंडी कुठे आहे असा अजब प्रश्नच पत्रकारांना विचारला.

स्वेटरविना पाच अंश सेल्सिअस तापमानात विद्यार्थी कुडकुडत असताना आदिवासी विकासमंत्र्यांना मात्र थंडी वाजत नाहीये. याला नेमकी कसली ऊब म्हणायची? नाशिकमध्ये पाच अंश सेल्सिअस तापमान असताना आदिवासी विकासमंत्री काय म्हणतायत ऐकलंत... एकीकडे आश्रम शाळातले विद्यार्थी प्रचंड थंडीत कुडकुडतायत. त्यांना वेळेत स्वेटर द्यायचे सोडून आदिवासी विकासमंत्री पत्रकारांना विचारतायत कुठे आहे थंडी...?

पुढील वर्षाच्या आदिवासी विकासाच्या नियोजनाची बैठक नाशिकमध्ये सुरू आहे... मात्र मंत्रीमहोदयांना थंडी वाजत नाहीये. ठाणे आणि नाशिक विभागांसाठी सुमारे तीनशे कोटी रूपयांचं नियोजन सावरांच्या उपस्थितीत होतंय. तर दुसरीकडे नाशिकमधल्या आश्रम शाळातले विद्यार्थी थंडीत कुडकुडतायत... त्यांना स्वेटर विना झोपावं लागतंय. तरीही मंत्रीमहोदय म्हणतात कुठे आहे थंडी... पत्रकारांनी पुन्हा त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी अजब स्पष्टीकरण दिलं.

स्वेटरच्या मुद्द्यावर आदिवासी विकासमंत्र्यांना घेरलं असता मुख्य सचिवांनी प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याने प्रोसेस पूर्ण होत नाही असं ते म्हणाले. मात्र नाशिकच्या आयुक्तालयात स्वेटर खरेदीची ऑर्डर दाखवण्यात आल्यावर दोघांचीही भंबेरी उडाली.

आदिवासी विकासाच्या नावावर कोट्यवधी रूपयांचा खर्च मार्च अखेर अपेक्षित असताना विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याबाबत कुणीही गंभीर नाही. फक्त स्वेटरच नाही, तर जेवण, पुस्तकं, अंडी, फळंही केवळ कागदावर मिळतात. त्यामुळे अर्थसंकल्पातला नऊ टक्के खर्च वाया जातो की काय असा संशय यामुळे उत्पन्न झालाय.