स्वच्छतेत नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम क्रमांक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जाहीर झालेल्या निकालात नवी मुंबई महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक तर देशात आठव्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 4, 2017, 10:37 PM IST
स्वच्छतेत नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम क्रमांक title=

मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जाहीर झालेल्या निकालात नवी मुंबई महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक तर देशात आठव्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला.  

नवी मुंबई शहराने पुन्हा एकदा स्वच्छ शहरांच्या यादीत आपलं स्थान कायम राखलंय. याआधी नवी मुंबई शहराला महाराष्ट्र सरकारचा संत गाडगे महाराज नागरी स्वच्छता अभियानाअंतर्गत दोनदा स्वच्छतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर २०१४-१५ मध्ये केंद्र सरकारच्या स्वच्छ शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळाला होता. 

नवी मुंबई शहरात महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात त्यामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होते. नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जगजागृतीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांसाठी एक पुरस्कार, तसंच सामुदायिक आणि सार्वजनिक, वैयक्तिक शौचालयांच्या दृष्टीने केलेल्या नियोजन आणि आराखड्यास दुसरा पुरस्कार मिळाला आहे. 

महापालिका हद्दीत ई टॉयलेट, शी टॉयलेट अशा विविध उपक्रमांसाठी स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट असे प्रथम क्रमांकाचे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. शहरात २०१४ ते २०१७ या कालावधीत ९३ सार्वजनिक शौचायलं शौचालयं, तसंच आधुनिक पद्धतीची स्मार्ट २० ई टॉयलेट आणि महिलांसाठी स्पेशल ६ स्मार्ट शी टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली. 

या पुरस्कारांमुळे नवी मुंबईकरांनी आनंद व्यक्त केलाय. कचरा उचलण्याच्या नियमीत पद्धतीवरही नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. नवी मुंबई शहरात राज्यातल्या इतर शहरांच्या तुलनेत कमी अव्यवस्था दिसते. त्याचं श्रेय अर्थातच महापालिकेला आहे. पण त्याचसोबत विशिष्ट आराखडा तयार करून निर्माण झालेल्या शहर व्यवस्थेलाही आहे.