प्रेमात माणूस आंधळा आणि चोरं ही होतो, पुण्यातील धक्कादायक प्रकार

 प्रेमात माणूस आंधळा होतो, असं ऐकलं होतं. मात्र प्रेमात माणूस चोर कसा होता, ते पाहा. हा धक्कादायक प्रकार घडलाय पुण्यामध्ये. 

Updated: Feb 23, 2016, 09:51 PM IST
प्रेमात माणूस आंधळा आणि चोरं ही होतो, पुण्यातील धक्कादायक प्रकार title=

अरूण मेहेत्रे, पुणे :  प्रेमात माणूस आंधळा होतो, असं ऐकलं होतं. मात्र प्रेमात माणूस चोर कसा होता, ते पाहा. हा धक्कादायक प्रकार घडलाय पुण्यामध्ये. 

(पाहा व्हिडिओ पाहा बातमीच्याखाली)

प्रेम म्हणजे चोरीचा मामला. एकमेकांचं हृदय चोरणं म्हणजेच प्रेम. पण पुण्यात राहणाऱ्या एका कॉलेज तरूणीला ही चोरी फारच महागात पडली. ही तरूणी, तिचा मित्र अजय कांबळे, अमोल जाधव आणि पप्पू खर्डेकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर त्यांचा पाचवा साथीदार अल्पवयीन असल्यानं त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलीय. या सगळ्यांवर आरोप आहे तो दागदागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्याचा.

धक्कादायक बाब म्हणजे ही चोरी झालीय ती आरोपी कॉलेज तरूणीच्या घरीच. दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या या मुलीचे तिचा वर्गमित्र असलेल्या अजय कांबळेसोबत प्रेमसंबंध आहेत. अजयला एक पल्सर बाईक घेऊन देण्याची तिची इच्छा होती. पण त्यासाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न पडल्यावर एक भन्नाट आयडिया तिच्या डोक्यात आली. आई वडिलांसोबत सहलीला जाण्यापूर्वी तिने स्वतःच्या घराच्या चाव्या अजयकडे दिल्या. कुटुंब सहलीला गेल्यानंतर अजय आणि त्याच्या साथीदारांनी मिळून तिच्या घरातला ११ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास केला. पोलीस तपासात हा सगळा प्रेमाचा आणि चोरीचा मामला उघड झाला.

घरामध्ये सगळं काही स्थिरस्थावर असताना, मित्रासोबत दक्षिण भारतात मौजमजा करायची अवदसा या तरूणीला आठवली. मात्र त्याआधीच चोरीचा पर्दाफाश झाला आणि दक्षिण भारताऐवजी त्यांची रवानगी पोलीस कोठडीत झाली. प्रेमात सगळं काही माफ, असं म्हटलं जात असलं तरी कायद्याच्या भाषेत चुकीला माफी नाहीच.