... इथे स्वस्त तूरडाळीसोबतच मिळतंय एक किलो मीठ!

तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानं सरकारने १२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे रेशन दुकानांमधून सर्वसामान्यांना डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. आता सरकारची डाळ रेशन दुकांनावर कधी येणार माहित नाही? पण औरंगाबादमध्ये मात्र सरकारच्या आधी व्यापाऱ्यांची डाळ स्वस्तात विक्रीसाठी आलीय.

Updated: Jul 28, 2016, 09:09 AM IST
... इथे स्वस्त तूरडाळीसोबतच मिळतंय एक किलो मीठ!  title=

विशाल करोळे, औरंगाबाद : तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानं सरकारने १२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे रेशन दुकानांमधून सर्वसामान्यांना डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. आता सरकारची डाळ रेशन दुकांनावर कधी येणार माहित नाही? पण औरंगाबादमध्ये मात्र सरकारच्या आधी व्यापाऱ्यांची डाळ स्वस्तात विक्रीसाठी आलीय.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी ही डाळ विक्रीसाठी बाजारात आणलीय. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून औरंगाबादच्या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनावरून प्रतिकिलो १२० दराने डाळ उपलब्ध करून दिलीय. 

वाढत्या महागाईमुळे गरीबांच्या ताटातली तूरडाळ कधीच नाहीशी झालीय. गगनाला भिडलेल्या या महागाईवर उतारा म्हणून आता सरकारने रेशन दुकानांवर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, त्याआधी सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून औरंगाबादच्या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनावरून प्रतिकिलो १२० दराने डाळ उपलब्ध करून देण्यात आल्याचं अप्पर जिल्हाधिकारी पी ए सोरमारे यांनी म्हटलंय.  

सामाजिक बांधिलकीतून व्यापाऱ्यांनी हा उपक्रम सुरू केला असून, पाच दिवसांसाठी सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्वस्त दरात डाळ मिळणार आहे. विशेष म्हणजे एक किलो डाळीबरोबर एक किलो मीठदेखील ग्राहकांना दिलं जातंय. 

व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सर्वसामान्यांना तात्पूरता दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने डाळींचे भाव आवाक्यात आणावे अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्राहकांनी व्यक्त केली आहे. 

यावर्षी तुरीच्या उत्पादनात दुष्काळामुळे मोठी घट झाली आहे. विदेशातून आयात करून घट भरून काढली जाईल आणि बाजारभावावर नियंत्रण ठेवले जाईल असं सरकारने जाहीर केलं होतं. मात्र,सरकार अजूनही डाळींच्या भावावर नियंत्रण आणू शकलेलं नाही. सरकारने आता रेशन दुकानावर तूरडाळ विक्रीचा पर्याय पुढे आणला असला तरी ही तूरडाळ कधी येणार आणि रेशन दुकानांवर विक्रीसाठी डाळ आली तरी प्रतिकिलो १२० रुपयेप्रमाणे सर्वसामान्यांना घेणं परवडेल का हा प्रश्नच आहे.