कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत आता महापौर नियुक्तीच्या हालचालींना वेग आलाय. आज दिवसभरातल्या घडामोडी पाहता सध्या तरी शिवसेनेचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.
एकमेकांवर जोरदार चिखलफेक करत स्वबळावर कल्याण डोंबिवलीची निवडणूक लढल्यावर महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेना आणि भाजप दोघेही हिरीरीने उतरल्याचं चित्र मंगळवारपर्यंत दिसत होतं. मनसेला 9 जागा मिळाल्यामुळे मनसेही किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं दिसत होतं. पण बुधवारपासून पुन्हा वा-यांनी दिशा बदललीय.
मनसेकडे अद्याप कोणी विशेष फॉर्म्युला दिलेला दिसत नाहीये. शिवसेना मनसेशिवाय सत्तास्थापनेकडे कूच करत असल्याचं चित्र दिसायला लागलंय. असं असलं तरी कल्याण डोंबिवलीच्या निमित्ताने उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं यादृष्टीने प्रयत्न सुरू झालेत. राज आणि उद्धव यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी या दृष्टीने मातोश्री आणि कृष्णकुंजच्या फे-या सुरू केल्या आहेत.
चंदूमामांची भूमिका
आधी करावे, मग सांगावे...
अशी माझी भूमिका आहे
त्यामुळे मी कॅमे-यासमोर आत्ता
काहीही बोलणार नाही
योग आलाय, जुळून येतो का
ते बघायचंय !
अशी प्रतिक्रिया चंदूमामांनी झी 24 तासशी बोलताना दिलीय. मात्र चंदूमामांची शिष्टाई सुरू असली तरी शिवसेनेनं मनसेव्यतिरिक्त सत्तास्थापना करता येतेय का याची चाचपणी सुरू केलीय.
शिवसेनेचे संख्याबळ ५९?
4 अपक्ष नगरसेवक, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे सेनेचं संख्याबळ 59च्या घरात पोहोचल्याचा दावा आहे.... भाजपा मात्र स्वतःचे 42 आणि 27 गाव संघर्ष समितीचे 9 जण असे 51 जण असल्याचा दावा करतंय. त्यामुळे शिवसेना सत्तेच्या अधिक जवळ पोहोचल्याचं चित्र निर्माण झालंय.
डावखरे मातोश्रीवर
राष्ट्रवादीचे ठाणे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे या शक्यतेला बळ मिळालं आहे. अर्थात डावखरेंनी ही ,सदीच्छा भेट असल्याचं सांगून याबाबतचा निर्णय पक्ष घेईल हे स्पष्ट केलंय.
शिवसेनेकडून दोन उमेदवार महापौरासाठी
11 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता महापौरपदाची निवडणूक होणार आहे असं आयुक्तांनी जाहीर केलंय. शिवसेनेकडून राजेंद्र देवळेकर, रमेश जाधव, दिपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांची नावं महापौरपदासाठी चर्चेत आहेत.
भाजपची मवाळ भूमिका
शिवसेनेलाच सध्या सत्तास्थापनेची संधी असल्याचं पाहून भाजपनेही आपली भूमिका मवाळ केल्याचं चित्र दिसंतय. अर्थात सत्तेसाठी त्यांनी जुळवाजुळवीचे प्रयत्न त्यांनीही सोडलेले नाहीत. निवडणुकीनंतर मनसेला महत्त्व आल्याचं दिसत होतं. पण शिवसेना कोणासोबत गणित जुळवते. यावरच मनसेचं इंजिन धावणार की यार्डात राहणार हे ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.