विनयभंग करणाऱ्या सुरक्षारक्षकाला विद्यार्थिनींची मारहाण

शाळा आणि वर्गही मुलींसाठी असुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावा अशी घटना घडलीय. ठाणे महापालिकेच्या शाळेत सुरक्षा रक्षकाने दोन मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नराधमाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून या मुलींनी आपली सुटका करून घेतली. झी 24 तासच्या बातमीनंतर या शाळेच्या मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षकांना निलंबीत करण्यात आलंय. 

Updated: Aug 27, 2016, 09:19 AM IST
विनयभंग करणाऱ्या सुरक्षारक्षकाला विद्यार्थिनींची मारहाण title=

ठाणे : शाळा आणि वर्गही मुलींसाठी असुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावा अशी घटना घडलीय. ठाणे महापालिकेच्या शाळेत सुरक्षा रक्षकाने दोन मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नराधमाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून या मुलींनी आपली सुटका करून घेतली. झी 24 तासच्या बातमीनंतर या शाळेच्या मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षकांना निलंबीत करण्यात आलंय. 

ठाणे महापालिकेच्या शाळेत प्राथमिक विभागाच्या शाळा क्रमांक 16 मध्ये संपूर्ण भयानक प्रकार घडला. 5 वीच्या वर्गातल्या दोन विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण कऱण्याचा प्रकार शाळेच्याच सुरक्षा रक्षकाने केला. या नराधम सुरक्षारक्षकाचं नाव विकास चव्हाण असं आहे. 

इयत्ता 5 वीत शिकणारी 10 वर्षांची मुलगी आपल्या मैत्रिणीसह मधल्या सुट्टीत खेळत असताना सुरक्षा रक्षकाने तिला सुरक्षा केबिनमध्ये नेलं. तिला अश्लील चित्रफीत दाखवत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न या नराधमाने केला. मात्र त्याचवेळी या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून मुलींनी तिथून पळ काढला.

या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नराधम विकास चव्हाण याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना 100 पेक्षा जास्त अश्लील चित्रफिती आढळल्या आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान ही बातमी झी 24 तासवर दाखवल्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पाच शिक्षकांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निलंबित केलंय. 

खरं म्हणजे शाळेतल्या चिमुरड्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेला सुरक्षा रक्षकच इथे भक्षक झालाय. या नराधमाने असे प्रकार याआधीही केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.