रत्नागिरीत सापडला भुयारी मार्ग आणि गुहा

Last Updated: Wednesday, January 11, 2017 - 22:51
रत्नागिरीत सापडला भुयारी मार्ग आणि गुहा

रत्नागिरी : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर पावसपासून जवळच असलेल्या शिवार आंबेरे ते नाखरे गाव असा सुमारे 10 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग सापडला आहे. तसेच नाखरे गावापासून ६ किलोमीटर अंतरावर देखील लिंबूवाडीत एक गुहा देखली जिद्दी माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांना सापडली आहे.

काळाच्या पडद्याआड गेलेल्या या भुयारी मार्गाला आणि गुहेला जिद्दी माऊंटेनिअरिंगने प्रकाशात आणले आहे. रत्नागिरीतल्या जिद्दी माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांकडून काळाच्या पडद्याआड गेलेल्या भुयारी मार्गांना आणि गुहांना प्रकाशात आणण्याचे काम सध्या सुरू आहे. रत्नागिरीपासून जवळपास 24 किलोमीटरवर असलेल्या शिवार आंबेरे गावातल्या मोर्येवाडीत एक भुयार सापडले आहे. हे भुयार नाखरे गावात बाहेर पडत आहे. ते 10 किलोमीटरचा असल्याचा दावा जिद्दी माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांनी केला आहे. 

भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळले आहेत. त्यामुळे हा मार्ग मोकळा करण्यास मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. हा भुयारी मार्ग अतिशय चिंचोळा असल्यानं एकावेळी एकच माणूस आत जावू शकतो. काही अंतरावर गेल्यावर वटवाघळे दिसून येतात. अनेक ठिकाणी झाडांची मुळेही आहेत. काही अंतरानंतर हा मार्ग खोल होत जातो. 50 फुटांपर्यंत हा मार्ग मोकळा केल्याची माहिती जिद्दी माऊंटेनिअरिंगचे अध्यक्ष धीरज पाटकर यांनी दिली.

लिंबूवाडीत पोहोचल्यावर माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांनी गुहा शोधली आहे. इथलीही गुहा लिंबूवाडी ते चांदोर गावात बाहेर पडत असल्याचा दावा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे या ठिकाणी कितीही उकाडा असला तरी गुहेत थंड वातावरण असते. गुहेत एका छिद्रातून सूर्यप्रकाश येतो. 

First Published: Wednesday, January 11, 2017 - 21:44
comments powered by Disqus