ठाणे : येथील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. सुरज परमार यांच्या आत्महत्या चिठ्ठीमध्ये खाडाखोड मिळालीय. काही नावं खोडण्यात आली आहेत.
सुसाईड नोट पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहे. खोडलेली नावं कोणाची हे अहवाल मिळाल्यावरच उघड होणार आहे. संबंधितांची चौकशी करून पोलीस कारवाई कऱण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, खोडलेल्या नावांमुळे नगरसेवक, पालिका अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे मनपामध्ये सेटलमेंट करण्यात प्राविण्य असलेल्या एका वास्तूविशारदावर संशयाची सुई असल्याची चर्चा रंगलीय.
बुधवारी सापडलेल्या १६ पानी सुसाईड नोटमध्ये परमार यांनी सिस्टीम विरोधात नाराजी व्यक्त केली होती.
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांची आत्महत्या ही बांधकाम व्यावसायिकांसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया ठाण्यातल्या बिल्डर्सनी दिलीय. परमार यांनी आक्षेप घेतलेल्या सरकारी धोरणांवर आणि पालिका प्रशासनातल्या अडथळ्यांवर तातडीने एमसीएचआयच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं बांधकाम व्यावसायिकांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.