भाजपकडून बीडची लोकसभेची जागा कोण लढवणार?

गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळं रिक्त झालेली बीड लोकसभेची जागा कोण लढवणार...? मुंडेंचा परळीचा विधानसभेचा गढ कोण राखणार...? पंकजा पालवे मुंडे, डॉ. प्रीतम खाडे मुंडे की यशश्री मुंडे..? 

Updated: Aug 20, 2014, 04:47 PM IST
भाजपकडून बीडची लोकसभेची जागा कोण लढवणार? title=

बीड : गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळं रिक्त झालेली बीड लोकसभेची जागा कोण लढवणार...? मुंडेंचा परळीचा विधानसभेचा गढ कोण राखणार...? पंकजा पालवे मुंडे, डॉ. प्रीतम खाडे मुंडे की यशश्री मुंडे..? 

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांचा वारसा कोण चालवणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला... पण आता एक नव्हे, मुंडेंच्या दोन-दोन कन्या वारसदार म्हणून राजकीय क्षितीजावर पुढे आल्यायत. 

पंकजा पालवे मुंडे आणि मुंडेंची दुसरी कन्या डॉ. प्रीतम खाडे. बीड लोकसभा पोटनिवडणुकीत मुंडेंच्या घरातील कुणीही उभं राहिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही, अशी घोषणा शरद पवारांनी केलीय. त्यामुळं बीडमधून भाजपच्या तिकिटावर पंकजा पालवे मुंडे निवडणूक लढवणार हे स्पष्टच आहे. 

मात्र गोपीनाथ मुंडेंचा विधानसभेचा परळीचा गड कोण राखणार, याची उत्सूकता सर्वांना लागलीय. परळीतून धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, हे निश्चित आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराचीच गरज भाजपला आहे. 

गोपीनाथरावांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे या निवडणूक लढवण्यास तयार नाहीत. तर यशश्री मुंडे राजकारणात येण्यासाठी अजून  लहान आहे. त्यामुळं आता दुसरी कन्या डॉ. प्रीतम खाडे यांचाच एकमेव पर्याय पुढे येतोय. याबाबत मुंडे कुटुंबीय काहीही बोलायला तयार नाहीत. तर मुंडेंनंतर बीड जिल्ह्याच्या पालकाच्या भूमिकेत आपण सदैव राहू, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय.

परंतु बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता, डॉ. प्रीतम खाडे यांच्यापेक्षा यशश्री मुंडेच जास्त यशस्वी ठरतील, असा विश्वास तज्ञांना वाटतोय.. कारण प्रीतम खाडे लग्नानंतर परळीपासून दुरावल्यात. तर यशश्री अखेरपर्यंत गोपीनाथ रावांच्या मुशीत वाढलीय. 

मतदारसंघातील जनतेला सुद्धा यशश्री जवळच्या वाटतात, आणि लहान बहिण उभी राहिल्यानं धनंजय मुंडेही दबावाखाली येवू शकतात, अशी शक्यता राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केलीय.

पंकजा पालवे मुंडेंना केंद्रात स्थान मिळावं यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्ली दरबारी शब्द टाकलाय. त्याला अजूनही प्रतिसाद नाही. आता संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडेंचा वारसा पुढे चालवतायत. 

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास पंकजांना मंत्रीपद मिळू शकते. त्यामुळं त्या दिल्लीला जातील का, अशीही शंका घेतली जातेय. मात्र त्याचवेळी लोकसभा आणि विधानसभेची जागा मुंडे कुटुंब स्वतःकडे राखण्याचा पूर्ण प्रयत्न करणार, हे देखील तेवढंच खरं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.