काय बोलले राज मातोश्रीतून बाहेर पडताना

काही लागलं तर फोन करा... सांभाळून राहा, असे राज ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडताना आपला मोठा भाऊ आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Updated: Jul 16, 2012, 09:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

काही लागलं तर फोन करा... सांभाळून राहा, असे राज ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडताना आपला मोठा भाऊ आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना सोमवारी सकाळी वांद्रयाच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी वेगाने राजकीय वर्तुळात पसरली. राज ठाकरे यांना हे कळताच त्यांनी आपला नियोजित अलिबाग दौऱा रद्द करून अर्ध्या रस्त्यातून लीलावती रुग्णालयात दाखल झाले. लीलावतीमध्ये पोचण्यापूर्वीच त्यांनी तेथील डॉक्टरांना फोन करून उद्धव यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केली.

 

रुग्णालयात पोचल्यावर उद्धव यांनी हात हातात मिळवून राज यांचे स्वागत केले. त्यानंतर राज यांनी 'आता तब्येत कशी आहे... तू आराम कर...' असा सल्ला उद्धव यांना दिल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

 

राज यांची पत्नी शर्मिला यादेखील ही माहिती कळताच लीलावतीमध्ये आल्या. रश्मी ठाकरे यांच्यासोबत त्या उद्धव ठाकरेंच्या रूममध्ये गेल्या.

 

उद्धव यांना तपासणी करण्यासाठी नेण्यासाठी राज त्यांच्यासोबत होते. 'काही काळजी करू नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस', असे त्यांनी यावेळी उद्धव यांना सांगितले.

 

उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय झाल्यावर त्यांनी स्वतःच्या गाडीतून मातोश्रीकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, यावेळी राज यांनी आपल्या गाडीतून मातोश्रीवर जाण्याचा आग्रह उद्धव यांच्याकडे धरला. मग उद्धव यांनी तो मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. लीलावतीतून मातोश्रीकडे जाण्याच्या दहा मिनिटांच्या प्रवासात हे दोघेही भाऊ एकमेकांशी गप्पा मारत असल्याचे दिसत होते.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर पोचल्यावर उद्धव आणि राज या दोघांना घरातील महिलांनी ओवाळून स्वागत केले. राज यांच्या चेहऱयावर यावेळी आनंदी भाव असल्याचे दिसून येत होते. दोघेही एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेले. त्यानंतर या तिघांनी एकत्रित बसून कॉफीचा आस्वाद घेतला. उद्धव यांची तब्येत एकदम ठीक असून काळजी करू नये, असे राज यांनी यावेळी बाळासाहेबांना सांगितले.