'साहेबां'शिवाय गरजणार सेनेचा नवा 'वाघ'?

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, June 19, 2013 - 10:15

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचा आज ४७ वा वर्धापनदिन... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे यंदा हा वर्धापनदिन अत्यंत साध्या पद्धतीनं पार पडणार आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाबाबत उत्सुकता असणार आहे.
शिवसेनेचा ४७ वा वर्धापनदिनाचा कार्यक्रम आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे यावर्षी मनोरंजनाचा कोणताही कार्यक्रम होणार नाही मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे पक्षाच्या कार्यकत्यांसह, राजकीय जाणकारांचं लक्ष असणार आहे.

> शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे.
> आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कार्यक्रम आखून देणे.
> पक्षात असलेल्या गटबाजीला लगाम घालून एकजूट राखणे.

> एक तपाहून सत्तेपासून दूर असल्याने नेते, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता दूर करणे.
> स्वतःची प्रकृती सांभाळून पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवणे.
> राज्यात मनसेची वाढती ताकदीचे आव्हान.
> महायुतीत समन्वय साधून वर्चस्व राखणे.
> धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा ऐरणीवर असताना एनडीएत हिंदूत्वाची भूमिका कायम ठेवणे.

… अशी अनेक आव्हानं उद्धव ठाकरे यांच्या पुढे आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलेल्या असल्या तरी बाळासाहेब ठाकरेंचे नैतिकबळ त्यांच्या पाठिशी होते. मात्र, आता बाळासाहेब हयात नसताना पहिल्यांदाच उद्धव यांना पक्षप्रमुख म्हणून आगामी निवडणुकांना सामोरं जायचंय. त्यामुळं स्वाभाविक सर्व जबाबदारी उद्धव यांच्यावर आहे. त्यामुळं उद्धव काय करिश्मा दाखवतात याकडे केवळ राज्याचंच नव्हे तर एनडीएचा घटक पक्ष म्हणून देशाचेही लक्ष लागले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 19, 2013 - 09:20
comments powered by Disqus