भुजबळांवर काळाने सूड उगवला : शिवसेना

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना करण्यात आलेली अटक म्हणजे काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड असल्याची खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.

Updated: Mar 16, 2016, 05:24 PM IST
भुजबळांवर काळाने सूड उगवला : शिवसेना title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना करण्यात आलेली अटक म्हणजे काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड असल्याची खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ यांना अटक झाल्यानंतर भाजप सरकार माझ्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. याला  शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलेय. भुजबळांना राजकीय सूडावर आक्रोश करण्याचा हक्क नाही. उगाचच काहीही बोलू नये, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.

 

सामना अग्रलेखात म्हटले, भुजबळ गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेचा दाखला देण्यात आलाय. भुजबळ गृहमंत्री असताना त्यांनी काही करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात पाठवण्याचा विडाच उचलला होता. तेव्हा सुद्धा राजकीय सूड आणि व्यक्तिगत द्वेषाचेच राजकारण होते.

शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी केंद्रातून पोलीस बळ, निमलष्करी दलाच्या तुकड्या मागवल्या. पण शिवसेनाप्रमुखांच्या अटकेच्या आगीत शेवटी भुजबळ यांचेच हात भाजले. शिवसेनाप्रमुख अग्निदिव्यातून अधिक उजळून तेजाने बाहेर पडले. त्यामुळे राजकीय सूडावर आक्रोश करण्याचा हक्क भुजबळांनी गमावल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

याशिवाय, गृहमंत्री म्हणून भुजबळांनी अनेकांना तुरुंगात पाठवले. ज्यांनी त्यांचे ऐकले नाही अशा अनेकांना खोट्या प्रकणात गुंतवले आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना तुरुंगात पाठवले, असे अग्रलेखात म्हणत शिवसेनेकडून भुजबळांवर आसूड ओढण्यात आलेत.