शिवसेनेत नाराजी!

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. मात्र पक्षातल्या ठराविक नेत्यांनाच त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतल्यानं अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये डावललं गेल्याची भावना रुजतेय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 21, 2013, 08:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. मात्र पक्षातल्या ठराविक नेत्यांनाच त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतल्यानं अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये डावललं गेल्याची भावना रुजतेय. यातूनच नाराज नेत्यांनी थेट पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवरच हल्ला करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे कुणाला उमेदवारी देता येईल याची चाचपणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करताहेत. लोकसभा मतदार संघांत पक्षाची स्थिती आहे हे स्थानिक पदाधिकारी आणि मुंबईतल्या संपर्क नेत्यांकडून जाणून घेतलं जातंय. आतापर्यंत 10 लोकसभा मतदारसंघांच्या बैठका पारही पडल्याहेत. यात ठाणे, कल्याण, नाशिक, राजापूर, रायगड, कोल्हापूर, उस्मानाबाद, अमरावती यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंसोबत फक्त विधानसभा गटनेते सुभाष देसाई आणि नेते लीलाधर डाके हे दोघंच या बैठकांना उपस्थित असतात. बैठकांमध्ये झालेल्या चर्चेविषयी कमालीची गुप्तताही बाळगली जातेय.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर आपल्याल जाणीवपूर्वक डावललं जात असल्याची भावना काही नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. महायुतीच्या समन्वय समितीतही काही ठराविक नेत्यांनाच स्थान दिलं जातंय. यामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये अवस्थता निर्माण झालीये. याच अस्वस्थतेतून काही नेत्यांनी थेट निर्णय प्रक्रियेवर हल्ला करण्यास सुरुवात केलीये.. नुकत्याच झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेना नेते रामदास कदम यांच्या संयमाचा बांध फुटला.
कदमांच्या भाषणापेक्षाही जास्त खळबळ माजली ती रविवारच्या `सामना`मध्ये कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेखामुळे. आपल्या साप्ताहिक सदरात त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत भूमिका मांडली. मुळातच शिवाजी पार्कमधून हटण्याची गरज होती काय, असा खडा सवाल राऊत यांनी केलाय. हा प्रश्न शिवसैनिकांना नव्हे, तर मागे हटण्याचा आदेश देणा-या उद्धव ठाकरेंनाच आहे, हे उघड आहे. बाळासाहेबांच्या कार्यकाळात निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनाही सध्या दूरच ठेवलं जातंय... आता ही बाब शिवसैनिकांच्याही लक्षात यायला लागलीये. त्यामुळेच अलीकडे या नेत्यांच्या नाराजीची धार वाढू लागलीये. ऐन निवडणूकीच्या रणधुमाळीत नाराजीची ही तलवार शिवसेनेलाच घायाळ तर करणार नाही ना, याची काळजी पक्षप्रमुखांना वेळीच घ्यावी लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.