चर्चेचं गुऱ्हाळ संपेना: भाजपचा नवा फॉर्म्युला शिवसेना मान्य करणार?

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीमधील चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. शिवसेनेनं देऊ केलेला 126 जागांचा प्रस्ताव भाजपानं फेटाळला असून, १३०-१४०-१८ असा नवा फॉर्म्युल्याचा प्रस्ताव आता भाजपनं शिवसेनेला दिलाय.  

Updated: Sep 21, 2014, 12:11 PM IST
चर्चेचं गुऱ्हाळ संपेना: भाजपचा नवा फॉर्म्युला शिवसेना मान्य करणार? title=

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीमधील चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. शिवसेनेनं देऊ केलेला 126 जागांचा प्रस्ताव भाजपानं फेटाळला असून, १३०-१४०-१८ असा नवा फॉर्म्युल्याचा प्रस्ताव आता भाजपनं शिवसेनेला दिलाय.  

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’वर केलेली चर्चाही निष्फळ ठरल्यानं महायुती अधांतरीच असल्याचं चित्र निर्माण झालंय. 

आज शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे युतीबाबत काय भूमिका जाहीर करतात आणि भाजपाच्या दिल्लीत होणाऱ्या केंद्रीय निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवारांची यादी निश्चित होते का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेनं 126 जागा भाजपाला देऊ केल्या असून स्वत: 155 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सात जागा शिवसेना सोडणार असून रिपाइं, रासपा आणि शिवसंग्राम या पक्षांना भाजपानं आपल्या कोटय़ातून नऊ जागा सोडाव्यात आणि स्वत: 117 जागा लढवाव्यात, असा नवा प्रस्ताव शिवसेनेनं शनिवारी संध्याकाळी भाजपाला पाठवला असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली. भाजपाच्या कोअर कमिटीनं हा प्रस्ताव अमान्य केला आहे.

रात्रीची चर्चाही निष्फळ

देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा ‘मातोश्री’वर दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा केली; मात्र या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. भाजपाला दिलेल्या 126 जागांमधून मित्र पक्षांना जागा सोडणं म्हणजे भाजपाला तोटा करून घेणं होय, असं फडणवीस यांनी सांगितलंय. आम्हीही सेनेला प्रस्ताव दिला असून त्यावर सकारात्मक विचार होईल, अशी आशा आहे.  

सेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज रंगशारदा सभागृहात होत असून त्यामध्ये उद्धव ठाकरे हे महायुतीबाबत आपली भूमिका मांडतील. 

त्याचवेळी भाजपाच्या केंद्रीय निवड मंडळाची बैठक आज दिल्लीत होत असून त्यामध्ये आपल्या उमेदवारांची यादी निश्चित करण्याचं भाजपनं ठरवलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.