मुख्यमंत्र्यांनी आणलं राष्ट्रवादीला अडचणीत

काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे पाटबंधारे विभागाचे सादरीकरण करणार होते, मात्र सादरीकरण नको तर श्वेतपत्रिकेचा मसुदाच मंत्रिमंडळासमोर आणा अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला अडचणीत आणलंय.

Updated: Jun 7, 2012, 08:41 AM IST

दीपक भातुसे, www.24taas.com, मुंबई

 

पाटबंधारे विभागाची श्वेतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचा पिछा सोडत नाही अशी स्थिती आहे. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे पाटबंधारे विभागाचे सादरीकरण करणार होते, मात्र 'सादरीकरण नको तर श्वेतपत्रिकेचा मसुदाच मंत्रिमंडळासमोर आणा'अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला अडचणीत आणलंय.

 

पाटबंधारे विभागाच्या श्वेतपत्रिकेवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखीन अडचणीत आणलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी पाटबंधारे विभागाचे सादरीकरण करण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र बैठकीत सादरीकरणाची वेळ आली तेव्हा काँग्रेसच्या मंत्र्यांनी सादरीकरणालाच हरकत घेतल्याचं समजतं. तटकरेंनी 1960 सालापासूनच्या पाटबंधारे विभागाच्या स्थितीचं सादरीकरण तयार केलं होतं. मात्र ‘एवढं सादरीकरण कशाला, मागील दहा वर्षांची आकडेवारी द्या’ असा हल्ला काँग्रेसच्या मंत्र्यांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही मागील 10 वर्षांची सविस्तर माहिती देण्याची सूचना केली. त्याचबरोबर आता सादरीकरण नको तर श्वेतपत्रिकेचा ड्राफ्टच मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणण्याची सूचना करून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला आणखी अडचणीत आणलंय. याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे मात्र मुख्यमंत्र्यांनी टाळलं.

 

जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी मंत्रिमंडळात सादरीकरण करण्याची दिवसभर जोरदार तयारी केली होती. राज्याच्या सिंचन क्षमतेबाबत उपस्थित केल्या जाणा-या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न या सादरीकरणात करण्यात आला होता. मागील दहा वर्षात राज्यात कशा पद्धतीनं सिंचन क्षमता वाढली, सिंचनावर झालेला खर्च कसा योग्य होता, अशी सविस्तर माहिती या सादरीकरणातून दिली जाणार होती. मात्र बैठकीत सादरीकरणाची तयारी दर्शवणा-या तटकरेंना काँग्रेसच्या मंत्र्यांनी रोखले आणि श्वेतपत्रिकेच्या मुद्याने पुन्हा डोके वर काढले. श्वेतपत्रिकेऐवजी सादरीकरणावर भागवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीची मात्र यामुळेच चांगलीच अडचण झाली असून काँग्रेससह मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला कोंडीत पकडले आहे.