पाऊस थांबवण्यासाठी देवीला गाऱ्हाणं

एरवी पाऊस पडत नाही म्हणून देवाला साकडं घालतात. आता गोंदिया जिल्ह्यातल्या शेतक-यांनी चक्क पाऊस थांबवण्यासाठी देवीला साकडं घातलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 4, 2013, 07:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गोंदिया
एरवी पाऊस पडत नाही म्हणून देवाला साकडं घालतात. आता गोंदिया जिल्ह्यातल्या शेतक-यांनी चक्क पाऊस थांबवण्यासाठी देवीला साकडं घातलंय. एरवी पाणी नाही म्हणून हवालदिल झालेले शेतकरी यंदा जास्त पावसाने हवालदिल झालेत.
गोंदीया जिल्ह्यातल्या शेतक-य़ांनी हा यज्ञ सुरू केलाय तो पाऊस थांबावा म्हणून. एरवी पाऊस पडावा म्हणून देवतांना साकडं घातलं जातं. यावेळी मात्र उलट आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरासरीपेक्षा यंदा दुप्पट पाऊस झालाय. एकट्या गोरेगाव तालुक्यात १२०० हेक्टर जमिनीला पावसाचा फटका बसलाय. त्यामुळे शेतक-यांनी पाऊस थांबावा असं साकडं देवीला घातलं
गोंदिया जिल्ह्यात १५९०१ हेक्टर शेतीला पावसाचा तडाखा बसलाय. विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झालीय. एक ऑगस्टपर्यंत गोंदिया जिल्ह्यात ९९४८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.
सरकारने शेतक-यांसाठी हेक्टरी साडेसात हजार नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलीय. मात्र ती पुरेशी नाही. त्यामुळे देवाने सरकारलाही बुद्धी द्यावी अशी मागणी देवीला करण्यात आलीय. बळीराजाचा हा पाऊस थांबवण्याचा यज्ञ चर्चेचा विषय झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.