हुंडा मागणाऱ्या नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात

महिलांवरील अत्याचाराचं हुंडा हे एक प्रमुख कारण आहे. अशाच एका लालची वराकडून हुंड्याची अवास्तव मागणी धुडकावून लावत लग्नाला ठामपणे नकार देण्याचं मोठं धाडस दाखवलं ते अहमदनगरमधील एका युवतीन. तिनं नवरदेवाला थेट पोलीसांत खेचलाय. काय आहे, तरुणीच्या धाडसाची ही कहाणी.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2013, 08:33 PM IST

www.24taas.com,अहमदनगर
महिलांवरील अत्याचाराचं हुंडा हे एक प्रमुख कारण आहे. अशाच एका लालची वराकडून हुंड्याची अवास्तव मागणी धुडकावून लावत लग्नाला ठामपणे नकार देण्याचं मोठं धाडस दाखवलं ते अहमदनगरमधील एका युवतीन. तिनं नवरदेवाला थेट पोलीसांत खेचलाय. काय आहे, तरुणीच्या धाडसाची ही कहाणी.
लग्न तोंडावर आलं असताना अव्वाच्या सवा हुंड्याची मागणी करणा-यांना नवरीनंच धडा शिकवल्याची घटना नगरमध्ये घडलीये. ही आहे वर्षा रणमले. दीपक मोरे याच्यासोबत तिचं लग्न ठरलं. पत्रिका वाटल्या गेल्यानंतर आणि अंगणात मांडव पडल्यावर मोरे कुटुंबियांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्या पुढे रेटायला सुरूवात केली.
वारेमाप सोनं, रोख रक्कम, लग्नात डीजे अशा अनेक मागण्या केल्या जात होत्या. या सगळ्याच पूर्ण होणं शक्य नाही, असं दिसल्यावर दीपकनं स्वतःच वर्षाला फोन केला आणि तिला अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. वर्षा रंगवत असलेली नव्या सुखी संसाराच्या स्वप्नांना यामुळे सुरूंग लागला. वर्षाला असा स्वार्थी जीवनसाथी नको होता. त्यामुळे तिथं धाडस दाखवलं आणि लग्नाला थेट नकार दिला.

एरवी घराण्याच्या आब्रुला जपून मुजोर वरपक्षापुढे नमतं घेणारा वधुपक्ष वर्षाच्या मागे ठामपणे उभा राहिलाय. वर्षा केवळ लग्न मोडून थांबली नाही, तर तिनं नवरदेव दीपक मोरे आणि त्याच्या घरच्यांची वरात थेट पोलीस ठाण्यात काढली.
लग्न म्हणजे दोन मनं जुळवणारा सोहळा. हुंड्याच्या नावाखाली होणारी ही पिळवणूक आता जास्त खपवून घेतली जाणार नाही, हे या झाशीच्या राणीनं कृतीतून सिद्ध केल्याने तिचे कौतुक होत आहे.