'सुपर सीरिज बॅडमिंटन`मधून सायना बाहेर

विश्व सुपर सीरिज बॅडमिंटनच्या सेमीफायनलमध्ये भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला मात पत्करावी लागलीय. त्यामुळे सायनाचं पहिलं-वहिलं विश्व सुपर सीरिज बॅडमिंटनचा किताब जिंकण्याचं स्वप्न भंगलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 16, 2012, 05:50 PM IST

www.24taas.com, शेनझेन
विश्व सुपर सीरिज बॅडमिंटनच्या सेमीफायनलमध्ये भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला मात पत्करावी लागलीय. त्यामुळे सायनाचं पहिलं-वहिलं विश्व सुपर सीरिज बॅडमिंटनचा किताब जिंकण्याचं स्वप्न भंगलंय.
तीन गेमपर्यंत चाललेल्या या सेमीफायनलमध्ये सायनाला चीनच्या ‘ली शुएरुई’नं मात दिलीय. लंडन ऑलिम्पिक खेळांत कांस्यपदक पटकावलेल्या सायनानं जगातल्या दुसऱ्या नंबरच्या खेळाडू शुएरुईविरुद्ध ५० मिनिट लढा दिला. पण, २०-२२, २१-७, १३-२१ अशा फरकानं सायनाला पराभवाला सामोरं जावं लागलंय.
बॅडमिंटनजगतातील तिसऱ्या नंबरची खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायनानं सुरुवात चांगली केली होती. पहिल्या गेममध्ये तीनं सलग सहा गुण मिळवले होते. पण शुएरुईनं त्याला प्रत्युत्तर देत ९-९ नं सामना बरोबरीत आणला. त्यानंतर मात्र सायनाचा खेळ चांगलाच थंडावला आणि शेवटी तिला पराभव पत्करावा लागला.