सीएसटी सुटकेस किलरचा छडा

मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. या सीएसटी सुटकेस किलर प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावलाय. याप्रकरणी आरोपी प्रवीण ठाकरेला अटक करण्यात आलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 13, 2012, 09:21 PM IST

www.24taas.com,पुणे
मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. या सीएसटी सुटकेस किलर प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावलाय. याप्रकरणी आरोपी प्रवीण ठाकरेला अटक करण्यात आलीय.
पिंपरीच्या चिखली भागातून पुणे क्राईम ब्रांचनं त्याला अटक केलीय. याप्रकरणी मृत महिलेची ओळख पटलीय. रोशनी ठाकरे असं या महिलेचं नाव आहे..कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं समोर येतंय.
रोशनी आणि प्रवीण दोघंही एकत्र राहत होते. प्रवीणचे प्रेमप्रकरण सुरु असून अनैतिक संबंध असल्याचा संशय रोशनीला होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडणं होत होती. दररोजच्या भांडणाला कंटाळून प्रविणनं रोशनीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला.
मृतदेह भरलेली सुटकेस घेऊन प्रवीणनं आपल्या मित्रासोबत पिंपरी चिंचवड रेल्वे स्थानकातून सिंहगड एक्सप्रेस पकडली. त्यानंतर दोघांनीही सिंहगड एक्सप्रेस सीएसटी स्थानकात येताच सुटकेस प्लॅटफॉर्मवर फेकली. याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. दरम्यान या प्रकरणी आरोपी प्रविणचा मित्र फरार आहे.