राज ठाकरेंच्या या धमक्यांचे झालं तरी काय?

राज ठाकरेंचा एकच आदेश आणि हजारो मनसैनिक पुढे सरसावतात... एकच एल्गार होतो... आणि `राजसाहेबांचा आदेश शिरसावंद्य` मानून अंमलातही आणला जातो.

Updated: Jan 24, 2013, 06:45 PM IST

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठविल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटतात. राज ठाकरेंनी फक्त खळ्ळ-फट्याक करताच राज्यासह-देशभरात रान उठविले जाते. राज ठाकरेंचा एकच आदेश आणि हजारो मनसैनिक पुढे सरसावतात... एकच एल्गार होतो... आणि `राजसाहेबांचा आदेश शिरसावंद्य` मानून अंमलातही आणला जातो. राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य करताच राज्यात त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना नेहमीच दिसून येतात.. सामान्यांच्या मनातील धगधग राज ठाकरें जेव्हा मांडतात. तेव्हा ह्याच सामान्य माणसाच्या मनातील राजसिहांसनावर राज ठाकरें आपसूकच अधिराज्य गाजवितात.
मग तो `मराठी माणसाचा प्रश्न` असो की, `उत्तर भारतीयांवर केलेली टीका` असो.. या साऱ्यांचाच परिणाम काय होतो हे देखील महाराष्ट्राने `याची देही आणि याची डोळा` पाहिले आहे. राज ठाकरेंनी आजवर अनेक विषयांवर आंदोलने केली आहेत, अनेक धमक्याही दिल्या आहेत. त्याचा योग्य असा परिणामही साधला गेला आहे. मात्र राज ठाकरेंनी दिलेले या इशाऱ्यांचं पुढं झाल तरी काय? राज ठाकरेंनी यापूर्वीही धमक्या दिल्या होत्या त्यांचं झालं तरी काय? हाच प्रश्न आता विचारला जातोय.... ?

राज ठाकरेंनी या पूर्वीही धमक्या दिल्या होत्या त्यांचं काय झालं?

टोलविरोधात आंदोलनात टोलबंदीची धमकी
राज्यभरात `टोलचा होणारा झोल`, सामान्य माणासाची टोलमध्ये होणारी लूट यावर राज ठाकरेंनी आवाज उठविला, `टोल विरोधात मनसे आंदोलन करेल, आणि `टोलचा झोल` बाहेर काढेल. आणि सामान्यांची होणारी लूट थांबेल.` असं म्हणताच टोलनाक्या विरोधात जनमानसात एकच लाट उसळली.... टोलनाक्यावर तुफान हल्ले झाले.. काही काळ अनेक टोलनाक्यांवरील वसूलीही थांबली... मात्र मनसेचा विरोध मावळताच टोलनाक्यावरच्या वसूलीसाठी असणाऱ्या `पोऱ्यांचा पुन्हा एकदा सामान्य चालकांवर आवाज चढू लागला`... तेव्हा राज ठाकरेंच्या टोलनाक्याच्या या धमकीच पुढं झालं तरी काय? असाच प्रश्न सामान्यांना पडला आहे.

पाकिस्तानी कलावंत आणि खेळाडूंना विरोध
सूरक्षेत्र या कार्यक्रमात पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग आणि आशा भोसले यांचा त्या कार्यक्रमाला असणारा पाठिंबा, त्यावर मनसेने केलेले पाकिस्तानी कलावंतांना विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी आशा भोसलेवर डागलेली तोफ, यानंतर बरेच हा चर्चेचा विषय बनला होता. मात्र काही दिवसांना हा विरोध विरून गेल्याचे दिसून आलं. त्याचप्रमाणे नुकतीच झालेली इंडिया पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सीरिजलाही मनसेने विरोध केला होता. मात्र या विरोधाचं नक्की झालं काय? पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊन खेळून गेलेही. मात्र त्यावर मनसेची कोणतीच ठोस भुमिका दिसून आली नाही.

खड्डेमुक्त रस्ते अन्यथा कंत्राटदारांना बांबू
रस्त्यावरील खड्ड्यांवर मनसेने आवाज उठवित अक्षरश: थैमान घातले होते. खड्डयांच्या प्रश्नावर मनसेने आंदोलन करीत थेट कंत्राटदारांना पकडून त्यांच्या श्रीमुखात भडकवून त्यांच्या कामाबाबत भर रस्त्याततच जाब विचारला जात होता. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी रस्त्यांची अवस्था झालेली असताना मनसे स्टाईलने आंदोलन झाल्याने सामान्यांना चांगलाच दिलासा मिळाला होता. कारण सांमान्यांची चीड मनेसेच्या या आंदोलनातून बाहेर येत होती. मात्र काही काळातच या आंदोलनाचे झालं तरी काय? हे ना सामान्यांना कळले ना... मनसेलाही

मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी सिनेमांना प्राधान्य
मराठीचा अजेंडा घेत राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनामनात घर केलं... मराठी हाच बाणा... हीच मराठी ओळख निर्माण होण्यासाठी राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर राजकरण करीत आपल्या पक्षाला बळकटी दिली... त्यावरच मराठी सिनेमांना डावललं जाणं ही एक बाब दिसून आली. त्यानंतर मनसेने मराठी सिनेमे मल्टिप्लेक्समध्ये लावले जावेत यासाठीही आंदोलन केलं. मात्र कालांतराने हाही विषय अलगदपणे मागे पडला... त्यामुळे मनसेच्या या धमक्यांचं झालं तरी काय? हा प्रश्न पुन्हा एकदा साऱ्यांनाच पडला..
आता पुन्हा एकदा या प्रश्नांकडे मनसे लक्ष घालणार का? याकडेच साऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.