राज ठाकरेंना थकवा, ४८ तास विश्रांतीची गरज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ४८ तास सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे उर्वरित दौऱ्याच्या आधी पुन्हा डॉक्टर तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2013, 08:57 PM IST

www.24taas.com, नागपूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ४८ तास सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे उर्वरित दौऱ्याच्या आधी पुन्हा डॉक्टर तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे हे सध्या नागपूरमध्ये विश्रांती घेत आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचा भंडारा आणि नागपूर जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आलाय. राज यांची प्रकृती चांगली नसल्याने तात्काळ त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित नागपुरात दाखल झाले आहेत. राज यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे कार्यकत्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. नागपुरातील त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्यात.

राज ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याचा दौरा केला. या दौऱ्यांत त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विदर्भ दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष होते. १५ मार्चपासून राज हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा आटोपला. त्यानंतर ते नागपूर दौऱ्यावर आलेत. मात्र, त्यांना तब्बेतीने दगा दिला.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या जरी बैठका रद्द झाल्या तरी अमरावतीमधील जाहीर सभा होणार आहे. राज यांच्या तब्बेतीमुळे उर्वरित बैठका आणि दौऱ्याबाबत अनिश्चितता कायम आहे, असे मनसेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेय.