इंग्लंडचा संघ विराट आणि कंपनीचा विजयी झंझावात रोखणार?

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत असो वा वनडे सामन्यात असो इंग्लंडने चांगली धावसंख्या उभारुनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलेय. 

Updated: Jan 18, 2017, 01:22 PM IST
इंग्लंडचा संघ विराट आणि कंपनीचा विजयी झंझावात रोखणार? title=

कटक : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत असो वा वनडे सामन्यात असो इंग्लंडने चांगली धावसंख्या उभारुनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलेय. 

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन कसोटींमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावांमध्ये चांगली धावसंख्या उभारली त्यानंतर पहिल्या वनडेतही त्यांनी ३५० धावांचा डोंगर उभारला मात्र विराट आणि कंपनीने या आव्हानांचा यशस्वीरित्या पाठलाग करताना इंग्लंड संघाला धूळ चारली. 

वनडे मालिकेतील दुसरा सामना उद्या कटक येथे होतोय. पहिल्या सामन्यात धक्कादायक पराभव स्वीकारल्यानंतर विराट आणि कंपनीना विजयी झंझावात रोखण्याचे मोठे आव्हान इंग्लंड संघासमोर आहे. 

मात्र दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखीनच उंचावलाय. पहिल्या वनडेत ३५० धावांचे मोठे आव्हान त्यातच पहिले चार फलंदाज ६३ वर तंबूत परतल्यानंतरही भारतीय संघाने हा सामना जिंकला. कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांनी अप्रतिम खेळी साकारताना संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे कामगिरीत सातत्य ठेवत दुसरा सामना जिंकून वनडे मालिकेवरही कब्जा करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. 

भारताची कामगिरी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर उंचावत चाललीये. मात्र याचे दडपण नक्कीच इंग्लंड संघाला आले असेल. भारत दौऱ्यावर आल्यापासून एकही सामना इंग्लंडने जिंकलेला नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्यांची रणनीती नक्कीच वेगळी असेल.