तिने फेसबुक फ्रेंड भेटीसाठी चोरली सात किलो चांदी

By Surendra Gangan | Last Updated: Friday, November 29, 2013 - 12:19

www.24taas.com, वृत्तसंस्था,जोधपूर
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अनेकांचे न सापडलेले मित्र भेटत आहेत. मात्र, इथं तर सोशल नेटवर्किंमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या मित्रांना भेटण्यासाठी तिने चक्क घरातच डल्ला मारला. मित्र भेटीसाठी आतूर झालेल्या एका २३ वर्षीय रोजिनाने चक्क घरातील सात किलो चांदीच चोरली.
जोधपूर येथील ही तरूणी फेसबुकवरील मित्रांना भेटण्यासाठी वेडीपिशी झाली. मित्रांना भेटण्यासाठी पैसे हवेत म्हणून तिने स्वत:च्याच घरातील चोरी केली. चक्क सात किलो चांदी चोरली. ३ राज्यांतील १२ शहरांत जाऊन फेसबुक फ्रेंडची भेट घेऊन दीड लाख रुपये खर्ची घातल्यानंतर महिनाभरानंतर ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
रोजिना ही गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी घरातून पळून गेली. इंदूरला जाऊन एका फेसबुक फ्रेंडची भेट घेतल्यावर त्याला तिने सगळी चांदी दिली. त्याच्याकडून दीड लाख रुपये घेतले. नंतर विविध शहरांचा प्रवास करत फेसबुक फ्रेंड्सला भेटत होती.
रोजिनाचे वडील रुस्तुम शेख यांनी पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार दिली. घरच्या लोकांना रोजिनाचे फेसबुकचे व्यसन माहीत होते. त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी फेसबुकद्वारे तिचा माग काढण्यास सुरुवात केली. शेवटी तेथूनच तपास लागला. मुलगी इंदूरमध्ये असल्याचे लक्षात आले. तिचे छायाचित्र पाठवून तेथील पोलिसांची मदत घेण्यात आली.
रोजिनाला इंदूर पोलिसांनी एका पार्कजवळ ताब्यात घेतले. २३ नोव्हेंबरला इंदूर पोलिसांनी तिला जोधपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी तिच्याकडे दीड लाख रुपयांपैकी अवघे ६०० रुपये शिल्लक उरले होते. दरम्यान, पोलिसांनी इंदूरच्या युवतीच्या इद्रिस नावाच्या फेसबुक मित्राला गाठले. रोजिना आली होती. तिने सात किलो चांदी दिली आणि दीड लाख रूपये घेतले. रोजिना १५ दिवस जयपूर, इंदूर व उत्तर प्रदेशात जाऊन फेसबुक मित्रांना भेटली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 29, 2013 - 11:19
comments powered by Disqus