शाही विवाह : जाधव यांनी मागितली माफी

नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 14, 2013, 04:43 PM IST

www.24taas.com, चिपळूण
नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर भास्कर जाधव यांना शरद पवार यांनी दिला होता. राज्यातील जनता दुष्काळाचे चटके सोसत असताना, लग्नावर उधळपट्टी करणे योग्य नाही. लग्नावर उधळपट्टी करणा-यांनी सार्वजनिक जीवनातून बाहेर पडाव अशा शब्दात खडेबोल पवार यांनी जाधव यांना सुनावले.

पवारांच्या टीकेनंतर भास्कर जाधव यांनी माफी मागितली. शरद पवार आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना माझा कान धरण्याचा अधिकार आहे. यापुढे आपल्याकडून पुन्हा, अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ असे जाधव यांनी सांगून वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केलाय.
जाधव यांच्या मुलाच्या शाही विवाहासाठी उद्योगमंत्री नारायण राणे सहकुटुंब, मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, हसन मुश्रीफ, भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुंनगंटीवार आदींसह राजकीय नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती.