जाधव vs तटकरे, राष्ट्रवादीच्या खेड कार्यालयाला ठोकले टाळे

माजी मंत्री आणि विद्यमान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यातील शीत युद्ध आता अधिकच चव्हाट्यावर आले आहे. भास्कर जाधव यांनी तटकरे समर्थक विद्यमान खेड तालुकाध्यक्षांची उचलबांगडी केल्याने वादत अधिक भर पडली. त्याचवेळी तटकरे समर्थक कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 23, 2013, 02:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माजी मंत्री आणि विद्यमान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यातील शीत युद्ध आता अधिकच चव्हाट्यावर आले आहे. भास्कर जाधव यांनी तटकरे समर्थक विद्यमान खेड तालुकाध्यक्षांची उचलबांगडी केल्याने वादत अधिक भर पडली. त्याचवेळी तटकरे समर्थक कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
कोकणात भरविण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद सुनील तटकरे यांना देण्यात आल्यानंतर खरी वादाची ठिणगी पडली. यावेळी भास्कर जाधव यांनी मी पालकमंत्री असताना त्यांना कसे स्वागताध्यक्ष केले, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर जाधव यांनी मीडियाशी बोलताना तटकरेंवर आर्थिक आरोप केलेत. त्यांच्याकडे बोट दाखविले. त्यानंतर तटकरे यांनी आमच्यात वाद नसल्याचे म्हटले होते. मात्र, दोघांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेत.
दरम्यान, संगमेश्वरमधील गडनदी प्रकल्प कामाची जाहिरात वृत्तपत्रात झळकली होती. या जाहिरातीत भास्कर जाधव यांचा फोटो तसेच नावही नव्हते. ही जाहिरात पाहताच जाधव यांचा पारा चढला. त्यांनी जाहीर सभेत वृत्तपत्राचे कात्रण घेऊन माझ्याकडे अधिकृत पुरावा मिळाला आहे, असे सांगत सुनील तटकरेंना अप्रत्यक्ष टार्गेट केले. मी पैसे आणले. मी कामे केलीत, मात्र श्रेय लाटायला हे, अशी टीका जाधव यांनी केली. त्यानंतर जाधव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले होते. आपल्यातील वाद आपल्यात मिटवा. मात्र, पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.
खेड तालुका राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष विजय कदम यांची उचलबांगडी करून भास्कर जाधव समर्थक ग. रा. चिकणे यांची निवड करण्यात आली. तसेच बाबाजी जाधव यांची प्रदेश सरचिटणीसपदावरूनही उचलबांगली केली गेली. खेडमधील बाबाजी जाधव, विजय कदम हे सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात.
तटकरे यांच्या विरोधात भास्कर जाधव यांनी खिल्ली उडविली होती. त्यावेळी विजय कदम यांनी तटकरेंची बाजू मांडत, त्यांनी कोकणात पक्ष वाढविल्याचे म्हटले. त्यामुळे जाधव समर्थक कार्यकर्ते नाराज झालेत. त्यांनी भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. भास्कर जाधव यांनी तात्काळ विजय कदम यांना डच्चू दिला. त्यामुळे भास्कर जाधव आणि सुनील तटकरे समर्थकांतील वाद शिगेला पोहोचला. त्यानंतर तटकरे समर्थक कार्यकर्त्यानी थेट तालुका कार्यालयाला टाळे ठोकत, भास्कर जाधव यांना खुले आव्हान दिले. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पेटल्याचे दिसत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.