`बोगस` आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला बेड्या!

आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत अनेकांना फसवणाऱ्या बोगस अधिकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. पोलिसी पेहरावात अनेक कार्यक्रमात तो मिरवायचा. अखेर त्याचं बिंग फुटलं आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 7, 2013, 07:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत अनेकांना फसवणाऱ्या बोगस अधिकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. पोलिसी पेहरावात अनेक कार्यक्रमात तो मिरवायचा. अखेर त्याचं बिंग फुटलं आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
वरवर साधाभोळा वाटणाऱ्या या बोगस पोलिसानं भल्या-भल्यांना आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत गंडा घातलाय. हेमंत पाटील नावाच्या या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी आयपीएसचा अभ्यास सुरु केला मात्र परीक्षा काही दिली नाही. असं असूनही तेव्हापासून तो स्वतःला आयपीएस अधिकारी समजू लागला. आयपीएस पोलीस अधिकाऱ्याचा पोशाख परिधान करुन गोंदिया जिल्ह्यातल्या गोडलाचे अप्पर पोलीस अधीक्षक असल्याची बतावणी तो करायचा... सार्वजनिक कार्यक्रमात मुक्तपणे वावरायचा... त्याच्या या मु्क्त वावरानं त्याच्यासोबत या कार्यक्रमात असणारे पोलीस आणि प्रतिष्ठित व्यक्तीही चकवा खात. मात्र, ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संग्रामसिंग निशाणदार यांच्या नजरेपासून हा भामटा बचावला नाही. संग्रामसिंग यांनी माहिती काढताच हेमंत पाटील बोगस आयपीएस अधिकारी असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या बोगस आयपीएस अधिकाऱ्याला त्याच्या गाडीसह अटक करण्यात आली.

या भामट्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. अटकेत असूनही तो हसताना दिसला. त्यानं आणखी किती जणांना फसवलंय याचा पोलीस तपास करत आहेत. त्यामुळं अशा बोगस अधिकाऱ्यांपासून तुम्हीही जरा सावधच रहा.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.