टाळी वाजलीच नाही, मनसेचं `एकला चलो रे`

ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात मनसेसह महायुतीला १८तर आघाडीला २२ जागा मिळाल्या आहेत.

Updated: Feb 5, 2013, 10:35 AM IST

www.24taas.com, ठाणे
ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात मनसेसह महायुतीला १८तर आघाडीला २२ जागा मिळाल्या आहेत. मनसेच्या पदरात दोन जागा पडल्या आहेत. ठाण्यातील रेस्ट हाउसमध्ये सोमवारी सर्व पक्षीय बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या युतीला घाबरून किंवा त्याचा परिणाम म्हणून आघाडीने बिनविरोध निवडीचा निर्णय घेतल्याचा आरोप सेना भाजपने केला आहे. तीनही पक्षाच्या नेत्यांची काल बैठक झाली होती मात्र, आयत्यावेळी माशी कुठे शिंकली माहित नाही, मनसेनं उचललेलं आपलं पाऊल मागे घेत युतीसोबत जाण्याचा निर्णयावर तूर्त तरी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या निवडणुकीत ‘मनसे एकला चलो रे’च्या भूमिकेत होती.
ठाण्यात काल सेना-मनसे-भाजपची एकत्र बैठक झाली होती. यामध्ये ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सेना-मनसे-भाजप एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आवाहनला प्रतिसाद म्हणून मनसे टाळी देणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तीनही पक्षाच्या नेत्यांनी याबाबत सकारात्मक बैठक झाल्याचंही म्हटलं होतं.