अजितदादांनी केला सरकारचा वांदा

हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद आणि सिंचन घोटाळ्याच्या मुद्यावरुन विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अजितदादांमुळे सरकारचा वांदा झाल्याचे दिसतआहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 11, 2012, 05:03 PM IST

www.24taas.com,नागपूर
हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद आणि सिंचन घोटाळ्याच्या मुद्यावरुन विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अजितदादांमुळे सरकारचा वांदा झाल्याचे दिसतआहे.
सिंचन घोटाळा प्रकरणात तडकाफडकी पदाचा राजीनामा दिलेल्या अजित पवार यांची पुन्हा उपमुख्यमंत्रिपदी करण्यात आलेली नेमणूक घटनाबाह्य असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ केला. नवीन मंत्री म्हणून पवार यांचा परिचय करून देण्याच्या प्रस्तावाला विरोधकांनी आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत निर्णय राखून ठेवला, तर विधान परिषद सभापतींनी हरकत फेटाळत कामकाजाला सुरुवात केली. निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.

विधानसभेत कामकाज सुरू होताच अजितदादा यांची सभागृहाला ओळख करून देण्याचा प्रस्ताव आला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी हरकत घेतली. उपमुख्यमंत्री पवार यांची नेमणूक घटनाबाहय़ आहे आणि ते मंत्रिपदी नाहीत, त्यामुळे त्यांची ओळख सभागृहाला करून देणे उचित ठरणार नाही, असे खडसे म्हणाले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उपमुख्यमंत्री हे पद घटनाबाहय़ असल्याचा निर्णय दिल्याचा दाखला देतानाच पवार यांनी घेतलेली शपथही घटनाबाहय़ असल्याचे खडसे म्हणाले. उच्च न्यायालयाचा निर्णय राज्य सरकार मान्य करणार आहे की नाही, असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला. त्यामुळे सरकराचा विधासभा अधिवेशनात वांदा झाला आहे.
दुसरीकडे सिंचन घोटाळा, महागाईचा निषेध आणि शेतीमालाला भाव देण्याची मागणी घेऊन भाजपचा नागपूर विधानभवनावर मोर्चा काढला. विधानभवनाजवळ गोवारी टी पॉइंट इथं मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. त्यानंतर विधानभवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार या मोर्चाचं नेतृत्व केलं.