स्टँडिंग ओव्हेशन

सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा देव... आता रिटायर होतोय.... जिद्द, परिश्रम, चिकाटी यांचं प्रतिक म्हणजे सचिन.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 10, 2013, 06:57 PM IST

डॉ. उदय निरगुडकर,
मुख्य संपादक, झी २४ तास
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा देव... आता रिटायर होतोय....
जिद्द, परिश्रम, चिकाटी यांचं प्रतिक म्हणजे सचिन.
मराठी माणसाला, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा सचिनचा भीमपराक्रम.
जगानं दंडवत घालावं असं कर्तृत्व बजावलं ते या विक्रमादित्यानं...
लहान वयात कीर्ती पदरात पडली की, अपकीर्तीही वाट्याला येतेच, हा समज खोटा ठरवला तो सचिननं...
आमच्या जगण्याचं संदर्भच त्याने बदलून टाकले, जगण्याच्या लढाईला धार आणली. सातत्याने जिंकायला त्यानं शिकवलं... न्यूनगंडावर कशी मात करायची, याचं बाळकडू त्यानं पाजलं... जेव्हा चारी बाजूनं अपयश घेरून टाकतं तेव्हा आदर्श म्हणून कोणाकडे पाहायचं असा प्रश्न तरूणाईला पडायचा तेव्हा आदर्श म्हणून सचिन तेंडुलकर आमच्यासमोर गार्ड घेऊन उभा होता...
समोरच्या विकेट्स धाडधाड पडत असताना पीचवर ठामपणे उभं कसं राहायचं, हे सचिननं आम्हाला शिकवलं...
ताशी 100 मैल वेगानं जेव्हा अडचणी धावून यायच्या, तेव्हा डोळ्याला डोळा भिडवून त्या अडचणींच्या चिंधड्या चिंधड्या कशा कराव्यात, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर...
मराठी माणसाचं पानिपत होत असताना अटकेपार झेंडे फडकवण्याची ऊर्मी ज्यानं दिली तो सचिन तेंडुलकर...
इतिहासाला आणि भविष्यालाही हेवा वाटावा असे हजारो सोनेरी क्षण आमच्या वर्तमानाच्या रिकाम्या झोळीत टाकणारा हा अवलिया... क्रिकेटच्या मैदानावरची त्याची अदाकारी पाहायला मी खाली का नाही? असा हेवा कदाचित पहिल्यांदाच आकाशातल्या परमेश्वरालाही वाटला असेल...
सचिन हा केवळ चांगला क्रिकेटपटूच नाही, तर चांगला माणूसही आहे... जेव्हा विरोधक चौफेर टीका करत असतात, तेव्हा थोबाड उघडायचं नसतं... जे काही बोलायचंय ते बॅटनेच, हे ज्यानं शिकवलं तो सचिन तेंडुलकर....
त्याला खेळताना पाहताना ट्रॅफिक थांबायचं, रेल्वेगाड्या थांबायच्या, विमानंही उडायची नाहीत... त्याची एक झलक पाहायला संसदही बंद पडायची... सचिनसाठी खरीखुरी युद्धं थांबायची आणि मैदानावरची सुरू व्हायची...
आपला मुलगा सचिन तेंडुलकर व्हावा, असं प्रत्येक मातेला वाटतं... प्रत्येक बहिणीला सचिनसारखा भाऊ हवाय, प्रत्येक व्यक्तीला त्याच्यासारखा मित्र हवाय आणि प्रत्येक खेळाडूला सचिनसारखा मार्गदर्शक हवाय... सचिन मैदानात खेळायला उतरला तेव्हा जन्माला न आलेली मुलंही आज त्याच्यासोबत टीममध्ये खेळतायत... हे फक्त अपवादानंच घडतं...
मराठी मनगटांना अनेकदा, अनेक आघाड्यांवर हार पत्करावी लागली... अशावेळी जे काही उभारीचे क्षण आले, त्यात सचिनचं योगदान मोठं होतं... मराठी माणसाला गुलामी सोडण्याची जिद्द सचिननं दिली. ताठ मानेनं, अभिमानानं जगायला शिकवलं...
सचिन तेंडुलकर नावाच्या या विक्रमादित्याची इतिहासानं नोंद घेतली, वर्तमानानं दखल घेतली आणि भविष्यही त्याच्यावाचून अधुरंच राहिल...
क्रिकेटच्या या देवाला आमचं स्टँडिंग ओवेशन....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.