दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

गेल्या महिनाभरात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय

Updated: Oct 5, 2018, 09:41 AM IST
दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या  title=
प्रातिनिधिक फोटो

नंदुरबार : दुष्काळी परिस्थितीला कंटाळून नंदुरबारमध्ये आणखी एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं समोर येतंय. मांजरे गावात ही घटना घडलीय. महत्त्वाचं म्हणजे, गेल्या महिनाभरात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय.

शेतात दुष्काळी परिस्थितीमुळे काहीही उत्पन्न हाती लागणार नाही... तसंच पीक पेरणीसाठी टाकलेलं भांडवलही त्यातून निघणार नाही, असं लक्षात आल्यानंतर नैराश्येच्या भरात नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावातील संतोष बळीराम पाटील या शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय. परिस्थितीसमोर गुडघे टेकत संतोषनं धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिलं.  

दरम्यान, पावसानं ओढ दिल्यानं धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचे दशावतार अनुभवत आहेत. पाऊस नसल्यानं शिवारात पीक नाही. त्यात कर्जाचा डोंगर वाढत चाललाय. त्यामुळे जगावं तरी कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.