...म्हणून धोनी, हरभजनची नव्हे; एका कॅमेरामनची मुलगी होतेय व्हायरल

तिच्या बाबांना तुम्ही पाहिलं का? 

Updated: Dec 28, 2019, 01:30 PM IST
...म्हणून धोनी, हरभजनची नव्हे; एका कॅमेरामनची मुलगी होतेय व्हायरल  title=
छाया सौनज्य : युट्यूब व्हिडिओ स्क्रिनग्रॅब/ T20 Mumbai

मुंबई : कोणत्याही मुलीसाठी तिचे बाबा म्हणजे जणू काही एक सुपरहिरोच असतात. बाबा जे म्हणणार ती पूर्व दिशा असं म्हणणाऱ्या काही मुलीही कमी नाहीत. मुळात वडील आणि मुलीच्या याच नात्याची अनेक रुपं आजवर विविध कारणांनी पाहायला मिळाली आहे. अनुक एका कारणामुळे ज्यावेळी वडीलांना मुलीचा अभिनमान वाटतो आणि तिच्यामुळे आई-वडिलांना नवी ओळख मिळते, त्याच्या बरंच आधी हीच मुलगी ही तिच्या वडिलांच्या नावाने ओळखली जाते. 

आपल्या वडिलांची अशीच ओळख सर्वांसमोर सांगण्यासाठी धडपड करणारी आणि मोठ्या गर्दीच्या ठिकाणी त्यात यशस्वीही ठरणारी अशीच एक चिमुरडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान तिच्यावर कॅमेरा खिळला आणि बस्स... तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सारंकाही सांगून गेला. 

ही चिमुरडी धोनी किंवा हरभजन सिंग किंवा मग कोणा एका क्रिकेटरची नाही. तर, ही मुलगी आहे एका कॅमेरामनची. पडला ना तुम्हालाही प्रश्न? T20 Mumbai या युट्युब चॅनेलवरुन T20 Mumbai लीग सामन्यातील काही सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका मुलीच्या हातात एक फलक आहे. या फलकावर असं काही लिहिलं आहे, जे सहासा क्रीडारसिक क्रिकेट मैदानात त्यांच्या आवडत्या खेळाडूंचं लक्ष वेधण्यासठी लिहितात. 

हातात फलक घेतलेल्या या मुलीच्या फलकावर कोणा एका खेळाडूविषयी नव्हे, तर चक्क तिच्या वडिलांविषयी लिहिण्यात आलं आहे. 'माझे बाबा कॅमेऱ्याच्या मागे आहेत', असं लिलिलेलं फलक एका कॅमेऱ्याला दाखवतानाचा तिच्या चेहऱ्यावरील आनंद बरंच काही सांगून जात आहे. आपल्या मुलीचा आनंद पाहून कॅमेरामनही तिला मोठ्या उत्साहात हात उंचावत तिच्याप्रतीच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. अतिशय सुरेख असे हे क्षण सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.