आधी कसोटी सामना गमावला, आता 2 स्टार खेळाडू बाहेर... टीम इंडियाला डबल धक्का

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर मात केली. आता दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला डबल धक्का बसला आहे.  दुसऱ्या कसोटीतून दोन स्टार खेळाडू बाहेर पडलेत.

राजीव कासले | Updated: Jan 29, 2024, 05:22 PM IST
आधी कसोटी सामना गमावला, आता 2 स्टार खेळाडू बाहेर... टीम इंडियाला डबल धक्का title=

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला (Team India) पहिला सामना गमवावा लागला. पहिल्या कसोटी इंग्लंडने ओली पोप (Ollie Pop) आणि टॉम हार्टलीच्या (Tom Hartley) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतावर 28 धावांनी मात केली. इंग्लंडच्या बॅझबॉल रणनितीची खिल्ली उडवणाऱ्या टीम इंडियाला घरच्या मैदानावरच पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे टीम इंडियावर जोरदार टीका होतेय. हे कमी की काय आता दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला डबल धक्का बसला आहे. टीम इंडियातले दोन स्टार खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. 

बीसीसीआयने (BCCI) निवेदन जारी करत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि फलंदाज के एल राहुल (KL Rahul) दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान 25 जानेवारीला हैदराबादमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारतावर 28 धावांनी पराभव केला. आता दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासन विशाखापट्टनममध्ये खेळवला जाणार आहे. 

जडेजा-राहुल बाहेर
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दोघंही दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी बीसीसीआयने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना टीम इंडियात स्थान देण्यात आलं आहे. 

हैदराबाद कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाला दुखापत झाली. तर केएल राहुलने पायाला दुखापत झाल्याचं कारण सांगितलं आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीत दोघांवर उपचार सुरु आहेत. भारतीय निवड समितीने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे. रणजी ट्रॉफीत मध्य प्रदेश सघाकडून खेळणाऱ्या आवेश खानलाही तयार राहाण्यास सांगतिलं आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार.

इंग्लंडची दमदार कामगिरी
पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंड संघाने दमदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात ओली पोपने 196 धावांची दमदार खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावांचा टप्पा गाठला आणि भारतासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवलं. पण घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाचा संपूर्ण संघ 202 धावांवर गारद झाला. इंग्लंडच्या युवा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीने अवघ्या 62 धावात 7 विकेट घेत इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.